दिवाळीही ओलीच राहणार? बंगालच्या उपसागरात तयार होतेय चक्रीवादळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 09:35 PM2022-10-19T21:35:37+5:302022-10-19T21:40:02+5:30

या अंदाजानुसार बुधवारी किंवा गुरुवारी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे....

Will Diwali also be wet rain update A cyclone is forming in the Bay of Bengal | दिवाळीही ओलीच राहणार? बंगालच्या उपसागरात तयार होतेय चक्रीवादळ

दिवाळीही ओलीच राहणार? बंगालच्या उपसागरात तयार होतेय चक्रीवादळ

Next

पुणे : गणेशोत्सवात पाऊस, नवरात्रीत पाऊस, दसऱ्याच्या आधी आणि नंतरही पाऊस. आता दिवाळीही पावसातच जाते की काय, अशी शंका आहे. कारणही तसेच आहे. पाऊस सारखा कोसळतोय, त्यामुळे दिवाळीही ओलीच राहणार, अशी शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होत आहे. परिणामी, ऐन सणाच्या काळात पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

या अंदाजानुसार बुधवारी किंवा गुरुवारी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. शुक्रवार ते शनिवारपर्यंत त्याची तीव्रता वाढून त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. रविवारपर्यंत ते चक्रीवादळात परावर्तित होईल, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी यांनी दिली. त्याची दिशा सध्याच सांगणे कठीण असले, तरी वेगवेगळ्या प्रारूपांवरून मिळालेल्या अंदाजानुसार, त्याचा प्रभाव आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अधिक राहिल.

या चक्रीवादळाला ‘सिटरंग’ असे नाव थायलंड या देशाने दिले आहे. या चक्रीवादळाची दिशा पश्चिमेकडे अधिक राहिल्यास ऐन दिवाळीतही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आताच याविषयी ठोस सांगता येत नाही. पुढील तीन-चार दिवसांत चक्रीवादळाची तीव्रता, दिशा यावरून राज्यात पाऊस किती व कसा पडेल हे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात बुधवारी सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, २१ व २२ तारखेपासून पाऊस आणखी कमी होऊन आकाश निरभ्र व कोरडे राहण्याचा अंदाज आहे, असेही डाॅ.काश्यपी म्हणाले. मात्र, चक्रीवादळ राज्याच्या दिशेने आल्यास दिवाळीत पाऊस असू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will Diwali also be wet rain update A cyclone is forming in the Bay of Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.