नाटकं करणार पण निम्म्याच मानधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:29+5:302020-12-04T04:28:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना टाळेबंदीनंतर नऊ-दहा महिन्यांनी व्यावसायिक रंगभूमी रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे कलाकारांचा ऑनलाईन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना टाळेबंदीनंतर नऊ-दहा महिन्यांनी व्यावसायिक रंगभूमी रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे कलाकारांचा ऑनलाईन सराव आणि पडद्यामागील तयारीलाही वेग आला आहे. आर्थिक गणित जुळवण्यासाठी पहिल्या फळीतील कलाकारांनी मानधनात ५० टक्के, तर दुसऱ्या फळीतील कलाकारांनी ३० टक्के कपात करण्याची तयारी दर्शवली आहे.
मार्चमध्ये कोरोनाचे अनपेक्षित संकट उभे राहिल्यानंतर नाट्यगृहे बंद झाली. आठ-नऊ महिन्यांच्या मोठया विश्रांतीनंतर नाटकांची तिसरी घंटा वाजणार आहे. १२ डिसेंबर रोजी पुण्यात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि मुंबईत ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. शासनाच्या नियमावलीनुसार, सुरक्षितेच्या सर्व उपाययोजनांचा अवलंन ५० टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरु होणार आहेत.
आर्थिक गणिताची घडी बसावी, यासाठी कलाकारांना मानधनात कपात करण्याची विनंती करण्यात आली होती. कलाकारांनी या निर्णयास तयारी दर्शवली आहे. बस भाड्यातही सवलत देण्यात आली आहे. टोलचा प्रश्न पुढील दोन-तीन दिवसांत मार्गी लागेल, अशी माहिती निर्माते आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘लोकमत’ला दिली. वाशी, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेने नाट्यगृहाचे शुल्क ७५ टक्कयांनी कमी केले आहे.
---------------
“सध्या सर्व मिटिंग, सराव ऑनलाईन होत आहे. खूप दिवसांनी नाटक होणार असल्याने ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी रंगीत तालीम होईल. प्रेक्षकांचा आतापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. खर्चामध्ये काहीशी कपात, तडजोड करुनच नाटकांचे आर्थिक गणित जुळू शकेल आणि सध्याच्या परिस्थितीत नाटके तग धरु शकतील.”
- प्रशांत दामले
---------------------
“नाट्यगृहे सुरु झाली ही सकारात्मक बाब आहे. प्रेक्षकही नाटकांना हजेरी लावण्यास उत्सुक आहेत. ऑनलाईन बुकिंगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑफलाईन तिकीट विक्रीही लवकरच सुरु होईल. सर्व नियम पाळून प्रयोग होतील.”
- समीर हंपी, नाट्य व्यवस्थापक
---------------------------------
“मी गेल्या ३० वर्षांपासून प्रशांत दामलेंसोबत काम करतो आहे. लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला. आता नाटके पुन्हा सुरु होणार असल्याचा आनंद मोठा आहे. खूप दिवसांनी सेटचे काम करण्याचे समाधान आहे.”
- मधुकर बाड, नेपथ्यकार
------------------------------