नाट्य संमेलनाध्यक्षांनाही निधी मिळणार का?
By Admin | Published: January 21, 2016 01:22 AM2016-01-21T01:22:46+5:302016-01-21T01:22:46+5:30
आजवर नाट्य संमेलनाध्यक्षांचे महत्त्व एका चौकटीपुरतेच मर्यादित राहिले आहे. नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी देण्याच्या दृष्टीने कोणतीही
पुणे : आजवर नाट्य संमेलनाध्यक्षांचे महत्त्व एका चौकटीपुरतेच मर्यादित राहिले आहे. नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी देण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाध्यक्षांनाही नाट्य क्षेत्रात योगदान देण्यासाठी निधी मिळणार का, अशी चर्चा साहित्य-नाट्य वर्तुळात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वच स्तरांवर उंची गाठून नवे पायंडे पाडले. सर्व माजी साहित्य संमेलनाध्यक्षांना मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व माजी अध्यक्षांनाही निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेनगरीत १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गंगाराम गव्हाणकर म्हणाले, ‘‘आपल्याकडील नाट्य परंपरा खूप समृद्ध आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने या परंपरेचे जतन होते. संमेलनात अध्यक्षांचा सन्मान केला जातो. त्या रंगकर्मीने दिलेल्या योगदानामुळे मिळालेला हा सन्मान असतो. अध्यक्षाला निधी मिळाल्यास तो पुढील वर्षभरात अनेक अभिनव उपक्रम राबवून रंगभूमीच्या परंपरेला समृद्ध करू शकतो व तरुणांमध्ये अभिरुची निर्माण करू शकतो. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला वर्षभरासाठी एक ओळखपत्र मिळावे, अशी मागणीही मी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ’’
फय्याज शेख म्हणाल्या, ‘‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच माजी अध्यक्षांना निधी मिळावा, असे माझे मत आहे. आमच्या पिढीच्या अनुभवाचा नवीन पिढीला उपयोग व्हावा, यासाठी खूप काही करावेसे वाटते; मात्र निधीअभावी मर्यादा येतात. नाट्य परिषदेने निधीचा प्रस्ताव संयोजकांसमोर मांडल्यास त्याचा विचार होऊ शकतो. नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद किमान दोन वर्षांसाठी असावे, असेही मला वाटते.’’
नाट्य परिषदेचे दीपक करंजीकर म्हणाले, ‘‘सरकारकडून नाट्य संमेलनासाठी मिळणारा निधीच अपुरा असतो. हा निधी संयोजकांतर्फे दिला जाणार असेल, तर उत्तम पायंडा पडू शकतो. ’’
(प्रतिनिधी)