शरद पवारांनी आदेश दिल्यास आंबेगावमधून लढणार; देवदत्त निकम यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 08:47 PM2023-09-14T20:47:05+5:302023-09-14T20:47:44+5:30
मंचरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) बैठक
मंचर: सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल मी एकही वाईट शब्द बोलणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. लोकशाहीत दडपशाहीने काम करू नये. लवकरच शरद पवार यांची तालुक्यात न भूतो न भविष्य अशी सभा होणार आहे. आमदार अथवा खासदार व्हायचंय, निवडणूक लढवायची आहे असे मी कधीही म्हटले नाही. मात्र शरद पवार देतील तो आदेश व बांधतील ते तोरण अशा शब्दात अप्रत्यक्षपणे आंबेगावमधून निवडणूक लढवण्याचे माजी सभापती, भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची बैठक मंचर येथे पार पडली. त्यावेळी निकम बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले ,उद्योजक किसन उंडे, दादाभाऊ थोरात,प्रमोद गोतारने, दामू अण्णा घोडे, गुलाब धुमाळ,धोंडीभाऊ भोर ,नानासाहेब फुलसुंदर ,कारभारी भोर ,सनी थिटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले, मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत मला उमेदवारी नाकारली. एक व्यक्ती एक पद हा नियम फक्त निकम यांच्या पुरताच का? नेत्यांनी लाथडले तरी जनतेच्या दारात जायचे ठरवले व जनतेने मला विजयी केले. आयुष्यभर शेतकऱ्यांचे ऋण फेडू शकणार नाही. कार्यकर्त्यांनी माझे स्टेटस ठेवले की त्यांना चारजण फोन करून स्टेटस का ठेवले असा जाब विचारतात. बदली करू, कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. ही दडपशाही आहे. भीमाशंकर कारखाना व बाजार समितीवर मला संधी दिली त्याबद्दल मी आदर करतो.मात्र बाजार समितीत एकटा असलो तरी सतरा जणांना मी घाम फोडतोय.
जगन्नाथ शेवाळे म्हणाले, राज्याचा विकासाचा खरा चेहरा शरद पवार आहेत. देशात ,राज्यात तसेच या तालुक्याचा कारभारच नाही तर कारभारी चुकला आहे. आगामी काळात येथील वाण बदलायचा असून भाकरीही फिरवायची आहे. आपले मत विभाजन झाले नसून मते वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस दराबाबत जाब विचारणार
वळसे पाटील यांच्या बद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही. त्यांचा फोटो आजही हृदयात आहे. मात्र यापूर्वी भीमाशंकर कारखान्याच्या बैठकीत संचालक म्हणून त्यांच्या शेजारी बसत होतो. जेव्हापासून शरद पवार यांच्या सोबत गेलो. तेव्हा मला शेजारी खुर्ची ठेवली नाही. मी समोर बसलो होतो. बाजार समितीच्या एकाही समितीत मला घेतले नाही. मी लढणारा कार्यकर्ता असून झुकणार नाही. संस्था तुमच्या मालकीची नसून जनतेची आहे. कारखान्याच्या वार्षिक सभेत त्यांच्या मांडीला मांडी न लावता समोर बसून ऊसाला भाव का मिळत नाही असा जाब विचारणार असल्याचेही देवदत्त निकम म्हणाले.