देशाला चांगला सक्षम पर्याय देऊ - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:31 AM2018-06-11T05:31:07+5:302018-06-11T05:31:07+5:30
सध्या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्त्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आजदेखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला सक्षम पर्याय देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
पुणे - सध्या देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्त्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आजदेखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला सक्षम पर्याय देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापन दिन व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे रविवारी झाली. सभेसाठी खासदार प्रफुल्ल पटेल, चित्रा वाघ, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, अण्णा डांगे, जयदेव गायकवाड जालिंदर कामठे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात शेतकरी, व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी कोणीच सुखी नाही. भाजपा सरकारच्या चार वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा विक्रम झाला. नोटाबंदीचा निर्णय किती फसवा होता, हे नेपाळमध्ये आजही भारतीय जुन्या नोटा बदलून मिळतात यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेली आश्वासने फसवी असल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे. देशात, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत परिर्वतन करण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत देशात सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल. भाजपा सरकारचे अपयश आता राष्ट्रवादी काँग्रेस माधुरी नाहीत तर मजुरांकडे, टाटाकडे नव्हे तर सर्वसामान्यांकडे, कपिलकडे नाहीतर बळीराज्याकडे जाऊन सांगितल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंत गाव तेथे राष्ट्रवादी ही संकल्पना होती. पण आपल्या समोरील आव्हान मोठे आहे. त्यामुळे या पुढे ‘बुथ तेथे राष्ट्रवादी’ अशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे. अजित पवार म्हणाले, कोणीही सत्तेच्या गुर्मीत राहू नये. आज सत्तेत असले तरी उद्या विरोधात बसू शकतात़ समाजातील एकही घटक समाधानी नाही.
राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. शेतकरी, शिक्षक, एसटी कामगार, सरकारी कर्मचारी संपावर, राज्यातील राज्यकर्ते करताय तरी काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, फौजिया खान आदींचीही भाषणे झाली.
महाराष्ट्र सदन सुंदर आणि भुजबळ अंदर
देशातील सर्वोकृष्ट वास्तू म्हणून दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची स्तुती केली जाते. मात्र, महाराष्ट्र सदन सुंदर आणि छगन भुजबळ अंदर. सदनाच्या बांधकामात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. सर्व निर्णय राज्य शासनाने घेतले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मी तुरूंगातून बाहेर यावे यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे भुजबळ म्हणाले.
वडिलोपार्जित घरावर जप्ती
माझी वडिलोपार्जित जमीन, घर यांच्यावर जप्ती आणली. एकाच ठिकाणी अनेक वेळा छापे टाकले गेले. त्यामुळे माझ्या घरातील महिला व लहान मुले घर सोडून दुसरीकडे जात होते. काही वेळा त्यांना शॉपिंग मॉलमध्ये जावून बसावे लागत होते. पवार स्वत: नेहमी माझी चौकशी करत. सुप्रिया सुळे यांनी माझी तुरूंगात अनेक वेळा भेट घेतली. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. परंतु, सर्व काही मी रडत कढत सहन केले, असे भुजबळ यांनी सांगितले.
भाजपावर उपरोधिक टीका
माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या खात्यात १५ लाख रुपये आले़ जिल्ह्यात सर्व ठिकाणी शौचालयाचा वापर सुरू आहे. गावात चुलीचा धूर दिसत नाही़ प्रत्येक गरीब महिलेला स्वयंपाकाचा गॅस मिळाला. त्याचा भाव वाढला नाही़ केंद्र सरकारचे आभार. प्रत्येक तरूणाला रोजगार मिळाला़ त्यामुळे सर्व सुखी आहेत, अशी टीका भुजबळ यांनी केली.
भुजबळ यांना महात्मा फुले पगडी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढील काळात मी सांगेल तीच पगडी वापरावी, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महात्मा फुले पगडी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याकडे सूपूर्द केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ही पगडी छगन भुजबळ यांना घालण्यात आली.