पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 04:31 PM2022-10-15T16:31:24+5:302022-10-15T16:31:42+5:30

या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे...

Will giving space to Purandar airport turn farmers into pilots pune new international airport | पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का?

पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का?

googlenewsNext

- श्रीकिशन काळे

पुणे :विमानतळाला जागा दिल्यानंतर आम्ही घर, दार सोडून जायचे कुठे? जमीन विकून पैसे हातात येतील; पण ते घेऊन करणार काय? इंडस्ट्री आली असती तर नोकऱ्या तरी लागल्या असत्या; पण आता विमानतळात आम्हा शेतकऱ्यांना वैमानिक थोडेच बनवणार आहेत ! आम्ही शेती विकल्या तर बेरोजगारच होऊ, त्यामुळे आमचा सर्व गावांचा जमीन देण्यास विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथे प्रस्तावित केले आहे. या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. त्यासाठी पारगाव, मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमधील ग्रामस्थांचा या विमानतळाला जमीन देण्यास विरोध आहे. त्यामुळे सरकार नेमके करणार तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कुंभारकर म्हणाले की, आम्ही या गावातील सर्व ग्रामस्थ अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेती करून गुजराण करतो. पाणी सिंचनाची सोय पुरंदर तालुक्यात झाली आहे. शेतीवर फळबागा आहेत. सीताफळ, डाळिंब, अंजीर या फळाला चांगली मागणी आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी सुखी आहोत. विमानतळ आल्यानंतर आमचे विस्थापन होणार आणि हा सर्व परिसर गजबजणार आहे. म्हणून आम्हाला ते सर्व नको आहे. जागा दिल्यानंतर आम्ही करायचे काय? एक तर इकडे कोणते उद्योग नाहीत. रोजगार कोण देणार आम्हाला?

जागा देऊन आम्ही वाॅचमनचे काम करायचे का? विमानतळामुळे सर्वत्र शहरीकरण होईल. आता निसर्गसंपन्न परिसर आहे. तिकडे चाकणला लोकांना विमानतळ हवे आहे, तर तिकडे करायला हवे. आम्हाला विमानतळ नकोय. शेवटपर्यंत आम्ही विमानतळाला विरोध करणार आहोत.

- संतोष कुंभारकर, सरपंच, उदाचीवाडी

स्थानिकांचा विराेधच

एकीकडे प्रशासन स्तरावर पुरंदर विमानतळाची अधिसूचना काढली, जमिनीचे दर जाहीर करणार, लवकर भूसंपादन करणार अशी सातत्याने चर्चा होत आहे. दुसरीकडे स्थानिक नागरिक मात्र जागा देण्यासाठी विरोध करीत आहेत.

गवताळ प्रदेशही धोक्यात

पुरंदर परिसरात कोल्हा, तरस, लांडगे यांचा अधिवास असलेली माळरानेही आहेत. त्यामुळे विमानतळ झाले तर त्यांचा संपूर्ण अधिवास नष्ट होणार आहे. येथील माळरान संवर्धन द ग्रासलॅन्ड ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. विमानतळामुळे गवताळ प्रदेशच धोक्यात येत आहे.

Web Title: Will giving space to Purandar airport turn farmers into pilots pune new international airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.