‘अॅम्फोटेरोसीन-बी’च्या वितरणावर येणार शासनाचे नियंत्रण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:54+5:302021-05-18T04:10:54+5:30
डमी - 715 पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा काळा बाजार समोर येत होता. आता म्युकरमायकोसिस म्हणजे ...
डमी - 715
पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा काळा बाजार समोर येत होता. आता म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगसवरील औषधांची मागणीही अचानक वाढली आहे. ‘अॅम्फोटेरोसीन-बी’चे एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना असून दिवसाला एका रुग्णाला ६-१२ इंजेक्शन लागतात. मागणी वाढल्याने भावही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी इंजेक्शनची किंमत आणि वितरणावर शासनाकडून नियंत्रण आणले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या याचे २७० रुग्ण असून दररोज २००० इंजेक्शनची गरज भासत आहे.
म्युकरमायकोसिसच्या उपचारात ‘अॅम्फोटेरोसीन-बी’या इंजेक्शनचा वापर केला जातो. इंजेक्शनची ५० मिलिग्रॅमची एक व्हायल एरव्ही २५०० ते ३००० रुपयांना पडते. या व्हायलची सध्याची किंमत ६-७ हजार रुपयांच्या घरात पोहोचली आहे. अंदाजे ७० किलोग्रॅम वजन असलेल्या व्यक्तीला दिवसाला उपचार पद्धतीनुसार सहा ते बारा व्हायलची गरज भासते. याचा अर्थ इंजेक्शनचा दिवसाचा खर्च ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही उपचार पद्धती पंधरा दिवस ते सहा आठवड्यांपर्यंत चालते. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढल्यावर किमतीतही अचानक वाढ झाली आणि काळा बाजार सुरू झाला. ‘अॅम्फोटेरोसीन-बी’ औषधाच्या किमतीतही आता वाढ होऊ लागली आहे. कंपन्यांकडील उत्पादन मर्यादित असल्याने आणि मागणी वाढल्याने आताच औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
--
‘अॅम्फोटेरोसीन-बी’इंजेक्शनच्या एका व्हायलची किंमत ७ हजार रुपये आहे. मागणी अचानक वाढली आहे आणि पुरवठा अद्याप मर्यादित आहे. त्यामुळे सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर शासनाचे नियंत्रण येऊ शकते.
- महेंद्र पितळीया, सचिव, फार्मासिस्ट असोसिएशन
--
इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागू शकते. हे टाळण्यासाठी शासनाने औषधाची माहिती आणि पुरवठा याबाबत माहिती देणारे ऑनलाईन पोर्टल सुरू करावे. नातेवाईकांनी या पोर्टलमध्ये मागणी नोंदवावी आणि औषध कधी, कुठे उपलब्ध होईल, याची माहिती त्यांना एसएमएसद्वारे मिळू शकेल.
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट
--
एका रुग्णाला एका दिवसाला लागतात १०-१२ डोस
एका रुग्णाला एका दिवसाला इंजेक्शनचे १०-१२ डोस लागतात. याचाच अर्थ एका दिवसाचा खर्च ५० ते ७० हजार रुपये असतो. हे उपचार १५ दिवस ते सहा आठवड्यांपर्यंत चालू शकतात. औषध मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने किमती वाढविल्या जात आहेत.
---
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण - २७०
दररोज लागणारी इंजेक्शन - २०००-२५००
--
सायनस, नाकातील रक्तवाहिन्या यामध्ये बुरशी वाढू लागते. मृतपेशी तयार होतात. त्यामुळे काळपट रंगाचा थर तयार होतो. संसर्ग सायनसकडून जबड्यात जातो. त्यामुळे जबड्याचे हाड खिळखिळे होते, दात हलू लागतात. संसर्ग डोळ्यांत गेल्यावर दृष्टीवरही परिणाम होतो. मधुमेहाचा त्रास असलेल्यांना याचा जास्त धोका असतो. कोरोना होऊन गेल्यावर दोन आठवड्यांनी चेहरा सुजतो, नाकातून स्राव होऊ लागतो, डोळ्यांना सूज येते. लक्षणे दिसू लागल्यास त्वरित सीटी स्कॅन करून घ्यावे.
- डॉ. राजेश यांदे, कान-नाक-घसातज्ज्ञ
--
म्युकरमायकोसिसमुळे डोळ्यांमधील नसांवर परिणाम होतो. दृष्टीवर परिणाम होतो, डोळे लाल होतात. आतल्या बाजूलाही संसर्ग पसरतो. या आजारात वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होत असल्याने एकत्रित उपचार करावे लागतात.
- डॉ. आदित्य केळकर, नेत्ररोगतज्ज्ञ
--
कोरोनामुक्त रुग्णांमध्ये सध्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढत आहे. दात हलणे, दुखणे, पू येणे, फोड येणे, वास येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी येणे, डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे काहींना वरचा जबडा, डोळादेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णांच्या तोंडाचा एक्सरे काढावा.
- डॉ. जे. बी. गार्डे, दंतशल्यचिकित्सक