इंदापूर तालुक्यातील बावीस गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:21+5:302021-02-07T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इंदापूर व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यावर वेगळ्या नियमाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इंदापूर व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यावर वेगळ्या नियमाचे बूच लावले होते. मात्र, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची खरी अडचण सांगितली. त्यानुसार पाण्यावाचून उपेक्षित असणाऱ्या २२ गावांचा शेती पाणीप्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी ज्या जाचक अटी होत्या त्या काढून टाकल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सहकार्य करतो आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी पवार यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षपदी होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्या वैशाली प्रतापराव पाटील, प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राहुल गुंडेकर, सचिन खामगळ, शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की बावीस गावांच्या शेतीपाण्याचा प्रश्न तसेच लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. कालव्याची वहन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना अधिकचे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, याकडे लक्ष दिलेले आहे. शेटफळ हवेली तलावाची उंची वाढवणे व उर्वरित राहिलेली कामे पूर्ण करणे, याकडेही माझे वैयक्तिक लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेतली गेली आहे.
इंदापूर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नसतानादेखील जवळपास ३३ कोटी रकमेचा निधी शहराच्या विकासकामांसाठी दिलेला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. मात्र, प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने आपल्या गावचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला जाईल. इंदापूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मोठ्या ताकदीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राबून घेतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
भरणे म्हणाले की, भारतातील एकमेव खरे शेतकऱ्यांना न्याय देणारी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक सक्षम होत आहेत. इंदापूर तालुक्यातील शाखेकडून जवळपास ८४ कोटी रुपयांचा नफा मागील वर्षी झालेला आहे. इंदापूर नगरपालिकेसाठी दोन कोटींची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली, मात्र येथील जनतेच्या विकासासाठी तब्बल ३३ कोटींचा निधी दिलेला आहे. मी मागील विधानसभेत विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील तेराशे साठ कोटी रकमेचा विकास निधी इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणला.
इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासाठी तब्बल दीडशे कोटीच्या रस्त्यांची कामे मंजूर करून घेतले आहेत. नीरा नदीवरील २ पुलांचे काम मार्गी लावण्यासाठी बोराटवाडी येथील पुलासाठी १६ कोटी, तर खोरोची येथील पूल उभारणीसाठी १२ कोटी रकमेचा निधी शासनाकडून मंजूर केला आहे. तर जल जीवन मिशन तालुक्यातील ७७ गावांत प्रभावीपणे राबवून ८० कोटींचा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
प्रदीप गारटकर म्हणाले, की इंदापूर नगरपरिषदेवर विरोधकांची सत्ता असून, देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात इंदापूर नगरपरिषद आल्यास सर्वांगीण विकास होईल.
_______________________________________
चौकट :
दत्तात्रय भरणे झाले भावुक
माझे वडील विठोबा भरणे यांचे मागील काही दिवसांमध्ये निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची इंदापूर तालुक्यामध्ये सभा असली की, स्वत: शेतकऱ्यांमध्ये बसून सभा ऐकायचे व त्यांना खूप मोठा आनंद व्हायचा. आज जर मी मंत्री म्हणून त्यांनी मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत स्टेजवर बघितले असते तर खूप मोठा आनंद झाला असता, अशी आठवण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यावेळी भावुक झाल्याने त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
_______________________________________
चौकट : विकासकामांचा दर्जा पाहिजे, अन्यथा खैर नाही
कोरोना कालावधी असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात निधीची चणचण आहे. तरी देखील इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी शासनाकडून निधी देत आहोत. मात्र कोणत्याही ठेकेदाराने किंवा अधिकाऱ्याने यामध्ये नियमबाहय काही करू नये. कामाचा दर्जा चांगला ठेवा. अन्यथा, त्या अधिकाऱ्याला व ठेकेदारांना सोडणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
_______________________________________
फोटो ओळ : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या प्रांगणात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व मान्यवर.