...तर राज्यात उद्योग येतील का ? - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2016 03:05 AM2016-05-01T03:05:50+5:302016-05-01T03:05:50+5:30
पावसाळा संपताच सरकारने पाण्याचे नियोजन करायला हवे होते; पण राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, याची जाहिरात केली जाते
पुणे : पावसाळा संपताच सरकारने पाण्याचे नियोजन करायला हवे होते; पण राज्यकर्ते परतीच्या पावसावर विसंबून राहिले. आता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, याची जाहिरात केली जाते, हे काय भूषणावह आहे का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. बिअर उद्योगाचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी द्यावे लागते म्हणून विरोध केला की, आम्ही मद्यनिर्मितीच्या विरोधात आहोत, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. पाणी आणि जमीन याच्या जोरावरच राज्यामध्ये उद्योग वाढतात. मग या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणून सरकारला राज्याला प्रगतिपथावर न्यायचे आहे की, राज्यामध्ये औद्योगीकरण होऊ नये यासाठीचे हे डावपेच आहेत याबाबत सरकाने आधी स्पष्ट करावे, अशी टीकाही त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या चव्हाण यांनी आदर्श प्रकरणाबाबत बोलणार नसल्याचे सांगितले.
चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. ‘राज्य दुष्काळमुक्त करु’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे कोणती जादूची कांडी आहे माहीत नाही, असा टोला लगावत अशाने राज्यात उद्योग येतील का?’’ असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.
अॅड. श्रीहरी अणे यांनी केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्वतंत्र होऊन विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिची चांगली होणार आहे का, स्वतंत्र झाल्याने तेथील विकास होणार आहे का, आणि दरडोई उत्पन्नामध्ये भर पडणार आहे का, हे आधी समजून दिले पाहिजे. उगाच कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचे म्हणून स्वतंत्र होण्याची मागणी करण्यामध्ये काही अर्थ नाही.
स्वस्त घर भूलभुलय्या प्रकरणा मध्ये सरकारमधील उच्चपदस्थांच्या भूमिकेची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मेपल ग्रुपच्या अगरवालला अटक का होत नाही, दोषींना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घरे देण्यामध्ये सरकार अपयशी ठरते तेव्हा असे प्रकार घडतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शंभर कोटी रुपयांचा महसूल बुडवून ‘आयपीएल’ चे सामने रद्द केले. सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही, असेही ते म्हणाले.
मोदीसरकारच्या कामावर लोक नाराज आहेत. दिल्ली, बिहार आणि अन्य ठिकाणच्या निवडणुकांमध्ये ते दिसून आले. मात्र, या देशात काँग्रेस आणि भाजपा या दोन मोठ्या पक्षांना बाजूला ठेवून राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे मोदी आणि भाजपाविरोधी आघाडी करताना काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय होऊ शकत नाही, अशी टिपण्णी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय ठरवता येणार नाही. मग, ते नितीशकुमार असतील किंवा अन्य कोणी, असा टोला त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना लगावला. भाजपाविरोधातील आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वांत विश्वासार्ह व्यक्ती असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले होते. त्यासंदर्भात चव्हाण यांनी भाष्य केले.