वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा

By नम्रता फडणीस | Published: April 12, 2023 04:41 PM2023-04-12T16:41:39+5:302023-04-12T16:41:50+5:30

वाहनचालकांना येत्या 30 एप्रिल रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये दंड भरून प्रकरण निकाली काढण्याची संधी उपलब्ध

will issue a non-bailable warrant against a motorist who has not paid fines for years; Motor vehicle court warning | वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा

वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा

googlenewsNext

पुणे : ज्या वाहनचालकांना ई-चलनाच्या माध्यमातून दंड  झाला आहे, मात्र वर्षानुवर्षे त्यांनी दंड भरलेला नाही. अशा वाहनचालकांच्या प्रलंबित खटल्यांची संख्या जवळपास लाखाच्या घरात पोहोचली आहे. या वाहनचालकांना येत्या 30 एप्रिल रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये दंड भरून प्रकरण निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  लोक अदालतीमध्ये उपस्थित राहाण्याकरिता न्यायालयाने समन्स बजावूनही संबंधित वाहनचालक हजर झाला नाही किंवा त्याने दंड भरला नाही तर त्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढला जाईल असा इशारा मोटार वाहन न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, लेन कटिंग, हेल्मेट न वापरणे, दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करणे, रॉंग साईड अशा अनेक प्रकारे वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा नियम तोडणा-या वाहनचालकांंना ई चलानदवारे आॅनलाईन दंड ठोठावला जातो. अनेक वाहनचालकांकडून हा दंड तत्काळ भरला जातो तर काही बेजबाबदार

वाहनचालकांकडून वर्षानुवर्षे दंड भरला जात नाही. अशा वाहनचालकांविरूद्ध पोलिसांकडून मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल केले जातात. 2018 ते 2023 पर्यंत सुमारे 1 लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. लोक अदालतीत ही प्रलंबित प्रकरणे दाखल केली जातात. येत्या 30 एप्रिलला पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने  जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम. छ.चांडक व सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी प्रलंबित खटल्यातील दंडाची रक्कम कमी देखील केली जाणार आहे. मोटार वाहन न्यायालयाने प्रलंबित प्रकरणातील 25 हजार वाहनचालकांना समन्स पाठविले आहेत. त्यांनी लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्क्कम भरावी व प्रकरण मिटवावे असे आवाहन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

''ज्या वाहनचालकांना प्रलंबित प्रकरणांमध्ये समन्स बजावले आहेत . त्यांनी लोक अदालतीत हजर राहून आपला दंड भरावा आणि प्रकरण मिटवून टाकावे. समन्स बजावूनही वाहनचालक उपस्थित राहिला नाहीतर आपल्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढून जास्तीची शिक्षा भोगावी लागू शकते. सुधीर वानखेडे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, मोटार वाहन न्यायालय, पुणे''

Web Title: will issue a non-bailable warrant against a motorist who has not paid fines for years; Motor vehicle court warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.