मोफत प्रवास होणार का?
By admin | Published: January 14, 2017 03:40 AM2017-01-14T03:40:29+5:302017-01-14T03:40:29+5:30
महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणेकरांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून मोफत प्रवास
पुणे : महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणेकरांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाची आचारसंहितेमुळे अंमलबजावणी करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मोफत प्रवासासाठी मार्च महिना उजाडावा लागणार, असे दिसते.
शहरातील वाढती वाहनसंख्या, प्रदूषणाला आळा तसेच पीएमपीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने महिन्यातील अखेरच्या सोमवारी पीएमपीमधून मोफत प्रवासाला मान्यता दिली आहे. त्यासाठी पीएमपीला सोमवारी मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा देण्यालाही मान्यता मिळाली आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला प्रशासनाची मान्यता मिळालेली नाही. पीएमपी प्रशासनाकडूनही सध्या मोफत प्रवासाच्या प्रस्तावावर फारशी तयारी नसल्याचे दिसते. त्यातच सध्या आचारसंहिता लागू झाल्याने या निर्णयात अडथळा येऊ शकतो.
अद्याप पालिका प्रशासनाने या निर्णयाला मान्यता दिलेली नाही. मोफत प्रवासाचा लाभ पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांनाही मिळणार आहे. त्यामुळे हा खर्च केवळ पुणे महापालिकेने का करावा, असाही मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. असे झाल्यास पिंपरी-चिंचवड पालिकेकडून याबाबत ठराव होणे आवश्यक राहील. त्यासाठी आचारसंहितेची आडकाठी येणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोणत्या मार्गावर किती बस सोडायच्या, त्यांच्या वेळा, बसची दुरुस्ती, ब्रेकडाऊन कमी करणे याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. मात्र, अद्याप नियोजनाबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. आता त्याला आचारसंहितेचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस तसेच फेब्रुवारी महिन्यातही मोफत प्रवास करता येणार नाही, असे दिसते.