पालिका व पोलीस आयुक्तांविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:30+5:302021-06-29T04:09:30+5:30
पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टीत करण्यात आलेली कारवाई बेकायदा होती. या कारवाईचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा ...
पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टीत करण्यात आलेली कारवाई बेकायदा होती. या कारवाईचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरुद्ध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा, तसेच न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
आंबेडकर यांनी सोमवारी संध्याकाळी वसाहतीमधील बाधितांसह नागरिकांची भेट घेतली. पावसाळ्यात कारवाई करू नये आणि कोणाचेही घर पाडले जाऊ नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. तरीदेखील प्रशासनाने कायदेशीर परवानगी न घेता कारवाईचा बडगा उगारला. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी हरित लवादाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
कोणत्याही परवानग्या नसताना पालिका आणि पोलिसांनी कष्टकरी गरिबांच्या घरावर जेसीबी चालविला आहे. बेकायदा कारवाईला पोलीस संरक्षण कसे देतात? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.