कात्रजमध्ये राष्ट्रवादीतर्फे आयोजन, बाबर पक्ष सोडणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:21 AM2018-06-02T07:21:03+5:302018-06-02T07:21:03+5:30
प्रभाग क्र. ४० कात्रज-दत्तनगरच्या नगरसेविका अमृता बाबर व राष्टÑवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, गुरुवारी झालेल्या
कात्रज : प्रभाग क्र. ४० कात्रज-दत्तनगरच्या नगरसेविका अमृता बाबर व राष्टÑवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, गुरुवारी झालेल्या राष्टÑवादी कार्यकर्त्या मेळाव्याला बाबर यांनी पाठ फिरवली. त्यामुळे बाबर पक्ष सोडणार की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
याविषयी अधिक माहिती अशी : काही दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या निवडीवरून अमृता बाबर यांचे व वंदना चव्हाण यांच्याशी वाद झाले होते. याविषयी सभागृहातच अमृता बाबर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अमृता बाबर या राष्टÑवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्व. अजित बाबर यांच्या पत्नी आहेत. अजित बाबर यांच्या निधनानंतर अमृता बाबर या सक्रिय राजकारणात उतरल्या व निवडूनही आल्या. त्यांचे दीर नमेश बाबर यांनी या प्रभागातील तिन्ही नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे भाजपाला एकही जागा जिंंकता आली नाही.
येत्या १० जून रोजी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या सभेची तयारी व कार्यकर्ता मेळावा याचे आयोजन धनकवडी येथील शिवछत्रपती कार्यालय येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला या भागातील सर्व नगरसेवक तसेच शहरातील पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक बॅनरवर अमृता बाबर व नमेश बाबर यांचे फोटोदेखील टाकण्यात आले होते. मात्र, या दोघांचीही या मेळाव्याला उपस्थिती नव्हती. त्यामुळे येत्या काळात अमृता बाबर काय भूमिका घेणार? याकडे सर्व कात्रज परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.