निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 07:16 PM2024-03-14T19:16:07+5:302024-03-14T19:18:54+5:30
आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले.
Sharad Pawar Pune PC ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही मतदारसंघांमधील राजकीय समीकरणे बदलत असल्याचं चित्र आहे. महायुतीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. मात्र आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने याबाबतची स्पष्टता यावी, यासाठी पत्रकार परिषदेत शरद पवार यांना एक कोड्यात टाकणारा प्रश्न विचारण्यात आला. मात्र पवार यांनी दिलेल्या चाणाक्ष उत्तराने तिथं चांगलाच हशा पिकला.
निलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का, याबाबतचा अंदाज यावा, यासाठी शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला. निलेश लंके हे मुंबईत राहतील की दिल्लीत जातील, असा तो प्रश्न होता. त्यावर शरद पवार यांनी लंके हे पारनेरमध्येच राहतील. तिथं दुष्काळ पडलेला असताना त्यांचं मुंबईत काय काम आहे, असं उत्तर देत लंकेंच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
निलेश लंकेंबाबत काय म्हणाले शरद पवार?
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळत शरद पवार म्हणाले की, "मी स्वत: निलेश लंके यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये गेलो होतो. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निलेश लंके यांनी अखंडपणे पारनेरच्या जनतेची सेवा केली. मधल्या काळात त्यांचे काही निर्णय झाले असतील किंवा नसतील, मात्र त्यांची बांधिलकी पारनेरच्या जनतेसोबत प्रामाणिकपणे होती आणि जे लोक बांधिलकी टिकवतात त्यांच्यासोबत आमची साथ कायम असते. अनेक लोक विरोधी पक्षातलेही असतात, पण लोकांसाठी काम करतात, त्यांनाही मी प्रोत्साहन देतो. निलेश लंके हे आज पक्षाच्या कार्यालयात आले, मी त्यांचं स्वागत करतो."
दरम्यान, "सध्या दुष्काळाचं सावट आहे, पारनेरच्या भागात पाऊस-पाणी कमी आहे. अशा काळात चिकाटीनं काम करणारा लोकप्रतिनिधी तिथं असणं आवश्यक आहे आणि निलेश लंके यांच्या रुपाने तिथे तसा लोकप्रतिनिधी आहे, याचा आम्हाला आनंद आहे. जनतेची सेवा करण्यामध्ये ते कमी पडणार नाही. जिथे आवश्यकता असेल तिथे आमच्या सर्वांच्या साथ त्यांच्यासोबत राहील," असं आश्वासनही शरद पवार यांच्याकडून देण्यात आलं आहे.