Noise Pollution: ध्वनिप्रदूषण असंच वाढत राहणार का? एरवी डीजे आता दिवाळीत फटाके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 03:20 PM2023-11-10T15:20:10+5:302023-11-10T15:20:56+5:30

मोठा आवाज करणारे फटाक्यातून क्षणाचा आनंद मिळतो पण आयुष्यभराचे दुःख देऊ शकतो

Will noise pollution continue to increase DJ now crackers on Diwali | Noise Pollution: ध्वनिप्रदूषण असंच वाढत राहणार का? एरवी डीजे आता दिवाळीत फटाके

Noise Pollution: ध्वनिप्रदूषण असंच वाढत राहणार का? एरवी डीजे आता दिवाळीत फटाके

पुणे: सण आणि उत्सवात ‘होऊ द्या आवाज’ म्हणत मोठमोठ्या आवाजात डीजे लावले जातात आणि माेठा आवाज करणारे फटाके उडवले जातात; पण हाच क्षणाचा आनंद आयुष्यभराचे दु:ख देऊ शकताे. स्वत:सह इतरांच्या आरोग्याच्या मुळावर उठू शकतो, याचे भानही कार्यक्रमांच्या आयोजकांना राहत नाही, असे मत सजग पुणेकर व्यक्त करीत आहेत.

गणेशोत्सवासह नवरात्र आणि लग्नसमारंभात डीजेंचा दणदणाट आणि दिवाळीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी यामाध्यमातून हाेणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यात वायुप्रदूषणाबराेबरच वाढत्या ध्वनिप्रदूषणाने पुणेकर मेटाकुटीला आले आहेत. हे थांबविणार कोण आणि कसे? हा खरा प्रश्न आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांमध्ये आवाजाची पातळी किती असावी याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत; पण सध्या हे आदेशही धाब्यावर बसविले जात आहेत. मुख्यमंत्री यांनी सण, उत्सव साजरे करण्याची मुभा दिल्याने यंदा गणेशोत्सव, नवरात्र हे दोन्ही उत्सव दणदणाटात साजरे झाले. विसर्जन मिरवणुकीत या सगळ्यांनी कळस गाठला होता. डीजेच्या दणदणाटामुळे लोकांच्या घरातील खिडक्यांच्या काचा हलायला लागल्या होत्या. पुणेकरांकडून तक्रारीही करण्यात आल्या; मात्र स्थानिक ‘दादा’-‘भाईं’च्या आशीर्वादाने गुन्हे मागे घेतले जातात. ही वस्तुस्थिती आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी नवरात्रीच्या तोरणांच्या मिरवणुकांवर बंदी घातली होती. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात पोलिसांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. तशाच कडक नियमांची व अंमलबजावणीची अपेक्षा पुणेकर करीत आहेत. पुणेकरांचे आरोग्य धोक्यात घालून सण-उत्सव साजरे करणार का? इतरांना त्रास होऊ न देता ते साजरे करण्याचा समंजसपणा पुणेकर दाखविणार? हा खरा प्रश्न आहे.

या परिणामाचं काय?

- ध्वनिप्रदूषणाने मानसिक आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होतात. आपला मेंदू मोठा आवाजाच्या बाबतीत सदैव सतर्क राहतो, अशा परिस्थितीत तुम्ही जास्त वेळ ध्वनिप्रदूषणात राहिलात तर चिंता आणि तणावाला बळी पडू शकता. या कारणास्तव चिडचिड, त्रास, तणाव, निराश आणि राग येण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
- ध्वनिप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम झोपण्याच्या वेळापत्रकावर होतो. झोप न लागणे, मध्येच झोप मोडणे, झोप संपण्यापूर्वी जागे होणे यांसारख्या समस्या आहेत. झोपण्याच्या चुकीच्या वेळापत्रकाचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. हे एकाग्रता आणि मूड दोन्ही खराब करते. मोठ्या आवाजामुळे अनेकवेळा ऐकण्याची क्षमताही कमी होऊ लागते. या असामान्य आवाजाच्या समस्येमुळे कान खराब होऊ शकतात. बहिरेपणा देखील येऊ शकतो.

ध्वनिप्रदूषणाची सुरक्षित पातळी ही ८० डेसिबलच्या आत आहे. आपण जे बारीक बाेलताे ते २० डेसिबल, सामान्य बाेलताे ते ४० डेसिबल, क्लासरूम ६० डेसिबल, फटाके ८० ते ९०, तर जेटचे इंजिन १३० डेसिबल आहे. ८० डेसिबलवरील आवाज किती वेळ राहताे, त्यावर नुकसान अवलंबून असते. ९० डेसिबल काही महिने किंवा राहिला तसा धाेका वाढताे. दिवाळीत आवाजाबराेबरच जे प्रेशर बदलतात, त्यामुळे कानाचे पडदे फाटू शकतात. माेठा फटाका फुटताे त्यावेळी व्हॅक्युम तयार हाेते आणि त्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रदूषण कमी करणे हाच एकमेव उपाय आहे. - डाॅ. समीर जाेशी, कान-नाक-घसातज्ज्ञ

Web Title: Will noise pollution continue to increase DJ now crackers on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.