"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 02:34 PM2022-11-03T14:34:17+5:302022-11-03T14:34:26+5:30
पेट्रोल पंपाप्रमाणे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत
सणसर : राज्यात ऑक्टोबर पासून गाळप हंगामास सुरुवात झाली. मात्र नेहमीप्रमाणे हंगामाच्या सुरुवातीसच एफआरपीसह अन्य मुद्द्यावर आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा संघर्ष करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी सणसर येथे ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक रकमी एफ आर पी घेतल्याशिवाय सोडणार नाही अशी डरकाळी फोडली. त्यामुळे ऊस पट्ट्यात पुन्हा एकदा संघर्ष होणार असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर एफआरपी ठरवण्याचे सूत्र बदलावे असेही त्यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले, पूर्वीच्या खर्चाच्या आकडेवारीवर अवलंबून राहून आता चालणार नाही. रासायनिक खताची वाढलेली किंमत,मजुरीत वाढ झाली. पण उसाच्या दरामध्ये त्या पटीत वाढ झाली नाही. साखर सम्राटांची मक्तेदारी मोडायची असेल तर संघर्ष करावाच लागेल. येणाऱ्या सात तारखेला साखर आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चाला शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. ऑनलाइन वजन काटे संपूर्ण राज्यभर व्हावेत यासाठी संघटना आग्रही आहे. सहकारी कारखान्यांपेक्षा खासगी कारखाने सर्रास काटे मारतात. आणि तरीही खाजगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांचे गाळप कमी होते. पेट्रोल पंपाप्रमाणे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत अशी मागणी ही त्यांनी केली.