जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:44 AM2024-05-13T10:44:21+5:302024-05-13T10:44:47+5:30
पुण्यात काल सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता
पुणे : पुण्यातील फडके हौद चौकात बुथवर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर लावून त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी करत ते फडके हौद चौकात आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत या जागेवरून हलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी यावेळी घेतला आहे. काही काळ दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामनेही आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना शांत केले.
पुण्यात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, तर महायुतीतर्फे भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लढतीत रंगत आणली असून, एमआयएमचे अनिस सुंडके हेदेखील रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.
काल सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. कालच्या आरोपाचा काही पुरावा नसून त्यांनी आंदोलन केले होते. आज आम्ही सर्व काही समोर घडत असून त्यांची उमेदवारी रद्द करावी असंगी मागणी रासने यांनी केली आहे.