गंजणार नाही अन् चोरीही जाणार नाही; रोहित्रांभोवती आता फायबर कुंपण!
By नितीन चौधरी | Published: October 23, 2023 06:54 PM2023-10-23T18:54:33+5:302023-10-23T18:54:44+5:30
पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत हे कुंपण फायदेशीर असल्याने महावितरणकडून पुणे परिमंडलामध्ये अशी २५० कुंपणे लावण्यात येणार
पुणे : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्र आणि डबल पोल स्ट्रक्चरच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी आता नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येत आहे. फायबर रिइन्फोर्स प्लास्टिकपासून तयार केलेले हे कुंपण असेल. पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत हे कुंपण फायदेशीर असल्याने महावितरणकडूनपुणे परिमंडलामध्ये अशी २५० कुंपणे लावण्यात येणार आहेत.
रास्तापेठ विभागाअंतर्गत लुल्लानगर येथे बसविलेल्या फायबर प्लास्टिक कुंपणाची पाहणी नुकतीच मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र भुजबळ उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, हवेली, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या २५० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिकचे जाळीदार कुंपण लावण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यालगत, दाट वस्ती, बाजारपेठांमध्ये आदी ठिकाणी वितरण रोहित्र आणि डबल पोल स्ट्रक्चर आहेत. या सार्वजनिक ठिकाणी वीज सुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी जाळ्यांचे संरक्षक कुंपण लावण्यात आले आहे. तथापि, पावसामुळे लोखंडी कुंपण गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरीद्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत. त्यामुळे लोखंडी कुंपणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणकडून सातत्याने उपाययोजना करावी लागत आहे.
प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
वीज सुरक्षेसाठी आवश्यक संरक्षक कुंपणावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आता लोखंडाऐवजी फायबर रिइन्फोर्स प्लास्टिकचा पर्याय समोर आला आहे. फायबर प्लास्टिकच्या सुमारे सात-आठ फूट उंचीच्या जाळीदार संरक्षक कुंपणावर ऊन-पावसाचा कोणताही परिणाम होत नाही. सडत नाही, तसेच आगीने जळत नाही. मजबूत व टिकाऊ असल्याने तुटणे, खराब होणे सहजशक्य नाही. भंगारात या प्लास्टिकला काहीच किंमत नसल्याने चोरी होण्याचे प्रकार होणार नाहीत. पुणे परिमंडलामध्ये वीज सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या २५० ठिकाणांची निवड केली असून, तेथे प्रायोगिक तत्त्वावर फायबर रिइन्फोर्स प्लास्टिकचे संरक्षक कुंपण लावण्यात येत आहे.