आकडेवारीचा घोळ पवार मिटवणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:40+5:302021-05-07T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कडक टाळेबंदी लागू करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना केली. त्या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कडक टाळेबंदी लागू करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना केली. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. ७) पुण्यात आहेत. कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्ण यांची जिल्हास्तरीय आकडेवारी आणि राज्यस्तरीय आकडेवारी यातला घोळ गेल्या वर्षभरापासून कायम आहे. ही आकडेवारी अद्ययावत करणे, त्रुटी दूर करणे, राज्य-जिल्हा स्तरावरील तफावत दूर करणे ही व्यवस्था बसवण्यात राज्याच्या आरोग्य विभागाला वर्षभरात यश आलेले नाही. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या आकड्यांमुळे देश आणि राज्य पातळीवर पुण्याचे चित्र चुकीचे मांडले जाते. हा घोळ मिटवण्यासाठी पवार आतातरी प्रयत्न करणार का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर उपस्थित झाला आहे.
कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने पवार शुक्रवारी पुण्यात येत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या वेळी उच्च न्यायालयाच्या सूचनेवर विचार होण्याची शक्यता आहे. कडक टाळेबंदी लागू होणार का, कडक टाळेबंदी म्हणजे नेमके काय या बद्दल पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.