ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 01:27 PM2020-08-14T13:27:36+5:302020-08-14T13:33:48+5:30
राज्य शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा 'प्लॅटिना' प्रकल्प असल्याचा दावा
पुणे : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना प्लाझ्मा देण्याच्या राज्यातील प्लॅटिना प्रकल्पाला ससून रुग्णालयामध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) च्या रुग्णालयातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या टप्प्यात रुग्णालयातील गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ‘प्लाझ्मा’ किती रोखणार, हे महत्वाचे ठरणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा प्लॅटिना प्रकल्प असल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे. यामध्ये ससून रुग्णालयासह राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णांवर चाचण्या केल्या जाणार आहेत. जुन महिन्याच्या अखेरीस नागपुर येथील रुग्णालयातील या प्रकल्पाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात प्रत्येक रुग्णालयामध्ये २० ते २२ याप्रमाणे सुमारे ५०० रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ससूनमध्ये ‘आयसीएमआर’च्या चाचणीमध्येही जवळपास तेवढ्या रुग्णांवर प्लाझ्माचे उपचार करण्यात आले आहेत. प्लॅटिनामध्ये ही संख्या वाढूही शकते. ही उपचार पध्दत प्रायोगिक पातळीवर असल्याने त्याच्या अभ्यासाअंती प्रकल्पाची व्याप्ती वाढविली जाणार आहे.
‘आयसीएमआर’कडून देशात विविध रुग्णालयांमध्ये ४५२ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग केला आहे. त्याचा अहवाल अद्याप उघड करण्यात आलेला नाही. या प्रकल्पामध्ये ससून रुग्णालयाचाही समावेश होता. याअंतर्गत पहिला रुग्ण ठणठणीत बरा झाल्याची घोषणाही रुग्णालयाकडून करण्यात आली होती. आता प्लॅटिना प्रकल्पही सुरू झाल्याने अनेक गंभीर रुग्णांचा त्याचा फायदा होणार आहे. ससूनमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्यांकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहिले आहे.
-----------------
‘सीआरपीएफ’च्या जवानांचेही प्लाझ्मा दान
राज्य राखीव पोलिस दला (एसआरपीएफ) पाठोपाठ आता केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवानही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. एसआरपीएफच्या सुमारे २० जवानांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान केले आहे. त्यामुळे ससून रुग्णालयामध्ये आता प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच ‘प्लाझ्मा’चा साठाही वाढला आहे.
-----------------