कोथरूड मतदारसंघ पुन्हा चर्चेत ; महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:40 PM2019-10-02T19:40:37+5:302019-10-02T19:55:32+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने कोथरूड विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. विद्यमान मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली होती.
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने कोथरूड विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. विद्यमान मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे अनेक इच्छुकही नाराज झाले होते. मात्र ज्येष्ठ नेत्याच्या उमेदवारीमुळे कोणीही बंड करायची हिंमत केली नाही. दुसरीकडे महाआघाडीने ही जागा मित्र पक्षांना सोडली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जागा लढवणार असल्याचे समजते. त्याकरिता उमेदवाराची चाचपणी सुरु झाली असून त्याकरिता 'मुळशी पॅटर्न' फेम प्रवीण तरडे यांना विचारणा झाल्याचे समजते.
तरडे हे वास्तव्यास कोथरूडमध्ये असले तर मूळचे मुळशी तालुक्यातील आहे. मात्र कोथरूडमध्ये त्यांचा चांगला वावर असून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते वारंवार सहभागी होत असतात. शिवाय मुळशी तालुक्यातील अनेक नागरिक कोथरूडला स्थलांतरीत झालेले आहेत, त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. हाच विचार करून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी तरडे यांना फोन केला होता. त्यावर त्यांनी उद्या दि. ३ तारखेच्या दुपारपर्यंत वेळ मागितली आहे. त्यामुळे तरडे यांनी होकार दिल्यास भाजपचे पाटील यांच्या विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे विरुद्ध प्रवीण तरडे असा तिरंगी सामना होऊ शकतो.