दोन्ही महापौरांसह जिल्हा परिषद अध्यक्ष बदलणार?
By Admin | Published: January 9, 2016 01:38 AM2016-01-09T01:38:48+5:302016-01-09T01:38:48+5:30
फक्त पुण्याचे महापौरच का? पिंपरी-चिंचवडचे महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदातही बदल करू या, नव्यांना संधीही मिळेल व आगामी सार्वत्रिक
पुणे : फक्त पुण्याचे महापौरच का? पिंपरी-चिंचवडचे महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदातही बदल करू या, नव्यांना संधीही मिळेल व आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पक्षासाठीही ते उपयुक्त ठरेल, असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी व्यक्त केला असल्याचे समजते. त्यामुळे पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांचा राजीनामा येत्या काही दिवसांत घेतला जाईल, अशी चर्चा आहे.
पुणे जिल्ह्यातील या तिन्ही महत्त्वाच्या पदांसाठी अजित पवार यांनी सव्वा वर्षाची मुदत निश्चित केली होती. ती आता पूर्ण झाली आहे. त्यानंतरच लगेचच या पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, अजित पवार काही आठवडे इथे नसल्यामुळे सर्व गोष्टी फक्त चर्चेच्या पातळीवरच होत्या. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेला पुण्यातील कार्यक्रम यशस्वी केल्यानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या स्नेहमेळाव्यासाठी अजित पवार आज पुण्यात होते.
सकाळपासूनच त्यांच्या बैठका सुरू होत्या. दुपारी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी या तिन्ही पदांचे राजीनामे एकाच वेळी घेण्याचा व त्यावर नव्या नियुक्त्या करण्याचा विचार व्यक्त केला. त्याला काही जणांना दुजोरा दिला.
काही जणांना मात्र या पदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे; त्यामुळे एका-एका पदाची निवड करू, असे सुचविले. मात्र, अजित पवार यांनी इच्छुकांची संख्या जास्त असेल, तर ते पक्षासाठी चांगलेच आहे. आपण योग्य व्यक्तीची निवड करू, असे स्पष्ट केले असल्याचे समजते. त्यांनी तिन्ही पदांचा बदल करण्याचे संकेत दिले असल्याने साधारण मंगळवारी या पदाधिकाऱ्यांचा राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राजकीय हालचाली अधिक गतिमान होतील, असे दिसते. (प्रतिनिधी)