नवले पुल ते कात्रज बोगद्या दरम्यानचे अपघात रोखणार; प्रशासन विविध उपाययोजना करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:58 PM2022-02-24T19:58:18+5:302022-02-24T19:58:49+5:30
जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी
पुणे : गेले काही वर्षांत मुंबई- बंगलोर रस्त्यावरील नवले पुल ते कात्रज बोगद्या दरम्यान होणारे विविध अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी गुरुवार (दि.24) रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह सकाळी सातच्या दरम्यान प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी विविध अडचणींवर चर्चा करून काही तातडीने तर काही दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.
मुंबई -बंगळूर महामार्गावरील पुण्यातील धायरी, नन्हे, वडगांव, आंबेगांव यासह महामार्गालगतच्या नागरिकांसाठी नवले पुल चौक ते कात्रज रस्त्या मृत्यूचा सापळा बनला आहे. यासंदर्भात हे अपघात टाळण्यासाठी तातडीने मार्ग काढा अशी मागणी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन, महानगरपालिका व संबंधीत विभागाची बैठक घेऊन व प्रत्यक्ष भेट देऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्या लगत टाकला जाणारा कचरा त्वरीत उचलणे व असा कचरा टाकणा-यावर कारवाई करावी, अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करणे, स्पीड ब्रेकर टाकणे अशी कामे करण्यात येणार आहेत.