पुणे-औरंगाबाद रस्ता ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:15+5:302021-05-20T04:11:15+5:30
भाग - २ पुणे : पुणे-औरंगाबाद रस्त्याचे हस्तांतरण रखडले आहे. येत्या वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ...
भाग - २
पुणे : पुणे-औरंगाबाद रस्त्याचे हस्तांतरण रखडले आहे. येत्या वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता हा रस्ता ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे (ग्रीन कॉरिडॉर) म्हणजे दुर्गम भागातून करण्याच्या दृष्टीने विचार करत आहे. अविकसित भागातील जमीन घेण्याचा विचार असून, त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या वर्षभरात सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना प्राधिकरणाने दिल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली.
पुणे-औरंगाबाद रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (भारतमाला) टप्पा-२ मध्ये विकसित करणार आहे. सध्या देशभरासह राज्यातील टप्पा-१ मधील महामार्ग विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-औरंगाबाद रस्ता हस्तांतरण रखडले आहे. पण, ती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
''ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे''चे फायदे
जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या बाहेरून हा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी अविकसित भागातील लोकांच्या पडीक जमिनी अत्यंत माफक भावात घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या भागातील लोकांसाठी देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. रस्ता हस्तांतरण प्रक्रिया झाल्यानंतर, पुढील ३ ते ५ वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन असणार आहे.
---
महामार्गावरील अतिक्रमण काढणे अवघड
पुणे-औरंगाबाद रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. विशेषतः वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कारेगाव, सुपा, केडगाव चौफुला, अहमदनगर शहर आणि पुढे अनेक गावांत अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्यासाठी यंत्रणेचा बराच वेळा जातो. त्यामुळे मुख्य गाव किंवा शहराच्या बाहेरून रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात येत आहे.
---
वाघोली ते शिक्रापूर दुमजली उड्डाणपुलाची चाचपणी
पहिल्या टप्प्यात वाघोली ते शिरूरपर्यंत रस्तारुंदीकरणचे काम सुरू आहे. मात्र, भविष्यात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोली ते शिक्रापूर या २५ किलोमीटरवर खाली आठ पदरी (८ लेन) रस्ता आणि दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.