Maharashtra Cabinet Expansion: पुण्याला 'पहिल्याच' महिला मंत्रीपदाची संधी मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:07 PM2022-08-08T20:07:39+5:302022-08-08T20:07:49+5:30
पुण्यातून आतापर्यंत एकही महिला मंत्री नाही
पुणे : नव्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळात पुण्यातून चंद्रकात पाटील यांचे मंत्रीपद पक्के मानले जात आहे. दुसरे मंत्रीपदही पुण्यालाच द्यायचे ठरले तर सध्या तरी भाजपसमोर पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या माधुरी मिसाळ यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्या मंत्री झाल्या तर पुण्यातून मंत्री झालेल्या त्या पहिल्याच महिलामंत्री ठरतील.
सन २००९ पासून म्हणजे तीन वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. शिवसेना भाजपाच्या युती सरकारच्या काळातच त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र त्यात गिरीश बापट कॅबिनेट मंत्री व पुण्याचे पालकमंत्रीही झाले. त्यामुळे त्यांचे नाव बाजूला पडले. आताच्या वेळेस तर मंत्रीपद मिळणारच अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना होती, मात्र सरकारच झाले नाही. आता पुन्हा त्यांना संधी आहे. पक्षश्रेष्ठींनी ठरवले तर त्यांना मंत्री होण्याची संधी मिळू शकते.
पुण्यातून दोन मंत्री कसे द्यायचे असा प्रश्न
आता पुन्हा सत्ताप्राप्ती झाल्यानंतर पुण्यातील अनेकांनी मंत्रीपदाची मनिषा बाळगली आहे. त्यात पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपद पक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय दुसरे मंत्री करायचे झाल्यास पर्वती विधानसभेच्या माधुरी मिसाळ या ज्येष्ठ आहेत. मात्र पुण्यातून दोन मंत्री कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्यास मिसाळ यांच्यासमोर अडथळा निर्माण होईल. ग्रामीण पुणे मधून मंत्री देण्याचा विचार झाल्यास दौंडमधील राहूल कूल यांच्याशिवाय सध्या तरी भाजपासमोर दुसरा पर्याय नाही. पुणे शहराला दोनपेक्षा जास्त मंत्री देता येत नाही व ग्रामीणमध्ये एकाशिवाय दुसरा पर्याय नाही अशी जिल्ह्यातील भाजपची सध्याची स्थिती आहे.