पुणे कॅम्पमधला फॅशन स्ट्रीट होणार बंद ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:20 PM2018-05-28T16:20:20+5:302018-05-28T16:20:20+5:30
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला पथारी व्यावसायिकांवर कारवाईसाठी न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्याने कॅम्पमधील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना आपल्या लाडक्या शॉपिंग डेस्टिनेशनला मुकावे लागणार आहे.
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला पथारी व्यावसायिकांवर कारवाईसाठी न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्याने कॅम्पमधील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना आपल्या लाडक्या शॉपिंग डेस्टिनेशनला मुकावे लागणार आहे. पुणे कॅन्टोन्मेटमधील एम जी रस्त्यावरील फॅशन स्ट्रीट अनेकांना खरेदीसाठी प्रिय आहे. विशेषतः रस्त्यावर खरेदी करणाऱ्यांना हा भाग कायमच आपलासा वाटतो. त्यामुळे कमीत कमी पैशांमध्ये फॅशनेबल कपड्यांसाठी पतरुणाईची पहिली पसंती असलेला फॅशन स्ट्रीट बंद होणार असून येत्या काही दिवसात त्यासाठीची पावले उचलली जाणार आहेत.
मुंबईतील कमला मिल येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर पुणे महापालिकेने संपूर्ण शहराचे फायर ऑडिट केले. त्यात कॅम्पमध्ये विशेषतः फॅशन स्ट्रीटवर अनेक खटकणाऱ्या आणि सुरक्षिततेसाठी धोका असणाऱ्या बाबी समोर आल्या. मुळात कॅंटोन्मेंट बोर्डाने ४०० स्टोलसाठी परवानगी दिली असताना विक्रेत्यांनी अतिक्रमण करून तिथे ८०० स्टोल उभारले आहेत. तिथे आग किंवा काही दुर्घटना झाल्यास बाहेर पाडण्यासाठी सुकर मार्ग नाहीत. याच विषयावर कॅंटोन्मेंट बोर्डाने पथारी व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या होत्या. दुसऱ्यांदा नोटीस बजावल्यावर या व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर कॅंटोन्मेंट बोर्डाकडून या स्टोलसाठी २००५साली १० वर्षांकरिता जागा देण्यात आली असून ती मुदत २०१५साली संपुष्टात आल्याचे सांगण्यात आले. हे सर्व विचारात घेऊन जिल्हा न्यायाधीश ए के पाटील यांनी या कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे फॅशन स्ट्रीट कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येते.दरम्यान या निर्णयानंतर अजून एक पथारी व्यावसायिकांचा गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.