रामदेवबाबांच्या प्रश्नांना ‘आयएमए’कडून प्रत्युत्तर मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:27+5:302021-05-27T04:12:27+5:30

पुणे : रामदेवबाबांच्या ‘पतंजली’तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनला विचारण्यात आलेल्या २५ प्रश्नांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोरोनाकाळात शासनाने आयुर्वेदाला ...

Will Ramdev Baba's questions be answered by IMA? | रामदेवबाबांच्या प्रश्नांना ‘आयएमए’कडून प्रत्युत्तर मिळणार?

रामदेवबाबांच्या प्रश्नांना ‘आयएमए’कडून प्रत्युत्तर मिळणार?

Next

पुणे : रामदेवबाबांच्या ‘पतंजली’तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनला विचारण्यात आलेल्या २५ प्रश्नांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोरोनाकाळात शासनाने आयुर्वेदाला डावलले असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, अॅलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने ‘आयएमए’तर्फे पुढील दोन दिवसांत तोडीस तोड उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. अॅलोपथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद नसून रुग्णसेवेला प्राधान्य द्यायला हवे, असाही सूर वैद्यक क्षेत्रातून उमटत आहे.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले, “कोरोनाकाळात राज्य सरकारच्या पातळीवर आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचा म्हणावा तितका प्रयत्न झाला नाही. आम्ही शासनाला वारंवार पत्रे लिहून पाठपुरावा केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अॅलोपॅथी श्रेष्ठ की आयुर्वेद, हा वाद घालण्याची ही योग्य वेळ नाही.”

केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जग सध्या कोरोनाचा सामना करत असताना सर्वच वैद्यकशास्त्रांनी अभिनिवेश बाजूला ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य द्यायला हवे, असे डॉ. गुप्ता म्हणाले. पतंजलीकडून आयएमएला काही प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात ते म्हणाले की आत्ताच्या काळात प्रतिक्रियावादी होणे उचित नाही. मात्र ही गरज का निर्माण झाली, याचाही विचार व्हावा. प्रत्येक शाखेचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करून त्याचा समाजहितासाठी उपयोग व्हायला हवा. यासाठी शासनाने समन्वयाचे काम करायला हवे. अॅलोपॅथिक डॉक्टरांची इतर पॅथीचे स्वीकार करण्याची वृत्ती कमी प्रमाणात पाहायला मिळते. मात्र हे वाद बाजूला ठेवायला हवेत.

चौकट

आयुर्वेदाला दर्जा द्या, ‘मिक्सोपॅथी’ हेच भविष्य

“आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचे आपापल्या जागी वेगळे महत्त्व आहे. रामदेवबाबांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत लगेचच निष्कर्षाप्रत येता येणार नाही. सध्या सगळेच जग गोंधळलेले आहे. या गोंधळातूनच काही प्रश्न निर्माण झाले असावेत. प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एखादी उपचार पद्धती प्रोटोकॉलमधून काढून टाकताना आयसीएमआर संस्थेने याबाबत पुरावेही द्यायला हवेत, अन्यथा शंकेला वाव राहतो. कोरोनाकाळात आयुर्वेदाला डावलले. तार्किक विश्लेषण करून आयुर्वेदातील उपचार पद्धतीला दर्जा द्यायला हवा होता. मात्र सध्या पॅथीमधील वाद महत्त्वाचा नसून रुग्णांना बरे करण्याचे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. ‘मिक्सोपॅथी’ हे भारताचे भविष्य असायला हवे. सर्व वैद्यकशास्त्रांनी एकत्र येऊन भारतीय विज्ञान जगासमोर मांडणे, हाच उत्तम उपाय आहे.”

- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

चौकट

रामदेवबाबांचे अधिकृत शिक्षण नाही

“रामदेवबाबा यांनी कोणतेही अधिकृत वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची त्यांची पात्रता नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आयएमए बांधील नाही. प्रश्न अत्यंत बालिश आहेत. ॲलोपॅथीने आयुर्वेदावर कधीच टीका केलेली नाही. आयुर्वेद हे थोर शास्त्र आहेच; मात्र आयुर्वेदाचा आश्रय घेऊन केले जाणारे व्यापारीकरण आणि लोकांची केली जाणारी दिशाभूल चुकीची आहे. एखाद्या वैद्यकीय शाखेतील शस्त्रक्रिया दुसऱ्या वैद्यकशास्त्र शाखेत घुसवण्याने उत्कर्ष होऊ शकत नाही. आयुर्वेद विरुद्ध आधुनिक वैद्यकशास्त्र असा वाद कधीच नव्हता. त्याला तसा रंग देण्यात आला.”

-डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

चौकट

विरोध शासकीय धोरणाला

“पतंजलीतर्फे आयएमला २५ प्रश्न विचारले. याबाबत योग्य दस्तावेज तयार करून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये उत्तर दिले जाईलच. अॅलोपॅथीने कोणत्याही इतर पॅथींना नावे ठेवलेली नाहीत. ‘मिक्सोपॅथी’ हा वाद ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा नसून शासकीय धोरणाला आमचा आक्षेप आहे. आयुर्वेदिक शिक्षणात ॲलोपॅथीशी संबंधित शस्त्रक्रियांना परवानगी देण्याबाबत मतभेद झाले. प्रत्येक वैद्यकशास्त्राला मर्यादा असते. कोरोनाचे औषध सध्या कोणाकडेच नाही. सध्याच्या गुंतागुंतीच्या काळात शांत राहून काम करणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेद ही आपली जीवनशैली आहे. मात्र, कामाचे योग्य विभाजनही गरजेचे आहे.”

- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, कृती समिती, आयएमए

Web Title: Will Ramdev Baba's questions be answered by IMA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.