आळंदीतील १२ मंदिरे हटविणार
By Admin | Published: December 10, 2015 01:30 AM2015-12-10T01:30:52+5:302015-12-10T01:30:52+5:30
मंदिर, मशीद आणि दर्ग्यांसह, खेड तालुक्यात एकूण १६० धार्मिक स्थळे अनधिकृत असून ती नियमित, निष्कासित किंवा स्थलांतरित करावयाची आहेत,
राजगुरुनगर : मंदिर, मशीद आणि दर्ग्यांसह, खेड तालुक्यात एकूण १६० धार्मिक स्थळे अनधिकृत असून ती नियमित, निष्कासित किंवा स्थलांतरित करावयाची आहेत, म्हणून त्याबाबत काही हरकती असल्यास खेड उपविभागीय किंवा तहसील कार्यालयात लेखी हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे आणि तहसीलदार प्रशांत आवटे यांनी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने आळंदीतील १२ मंदिरे निष्कासित करण्याचा आणि ३ मंदिरे स्थलांतरित करण्याचा कृती आराखडा करण्यात आला आहे.
सोसायटी फॉर फास्ट जस्टिस व इतरांनी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, निष्कासित किंवा स्थलांतरित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून शपथपत्र उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खेड तालुक्यातील १६० धार्मिक स्थळांची प्रारूप यादी बनविण्यात आली आहे. यात १४५ धार्मिक स्थळे नियमित करण्याचा प्रस्ताव असून आळंदीतील १२ मंदिरे निष्कासित करण्याचा आणि ३ मंदिरे स्थलांतरित करण्याचा कृती कार्यक्रम आहे. याबाबत ११ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान हरकती मागविण्यात आल्या आहेत.
आळंदीतील ४० फुटी रोड पद्मावती, ३० फुटी रोड, घुंडरे आळी कॉर्नर, कामगार वसाहत, सुयश लॉज देहूफाटा, चाकण चौक, महाराष्ट्र बँकेसमोर गावठाण, भागीरथी नाल्याजवळ गावठाण, व नवीन पूल व जुन्या पुलाच्या मध्ये, धाकट्या पादुकांच्या डाव्या बाजूचे, विठ्ठल रखुमाई चौक, शाळा क्र. २ गावठाण या बारा ठिकाणची गणपती मंदिरे निष्कासित करण्याचा प्रस्ताव आहे. भराव रस्त्यावरचे पितळी गणपती मंदिर, ४० फुटी पद्मावती रोडचे मारुती मंदिर, ३० फुटी रोडचे तुळजाभवानी मंदिर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. (वार्ताहर)