तळजाईवरील काँक्रिटीकरण काढून टाकणार; नगरसेवकांकडून नागरिकांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:31 AM2019-07-11T11:31:27+5:302019-07-11T11:33:50+5:30
काँक्रिटीकरणाच्या मुद्द्यावर आयुक्त कार्यालयात बैठक
पुणे : तळजाई टेकडीवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणावर आणि येथील जैवविविधता प्रकल्पावर महापालिका आयुक्तालयासमोर सादरीकरणाचे आयोजन केले होते. परंतु पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी टेकडीवर कसलाही प्रकल्प नको, अशी भूमिका घेऊन सादरीकरण करायला विरोध केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत टेकडीवरील काँक्रिटीकरण काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन स्थानिक नगरसेवक आबा बागुल आणि स्वीकृत सदस्य सुभाष जगताप यांनी दिले.
तळजाईवर गेल्या काही महिन्यांपासून काँक्रिटीकरणावर भर दिला जात असून, टेकडीचे सौंदर्य नष्ट होत आहे. तसेच जैवविविधता प्रकल्पामध्ये कौशल्य विकास केंद्र, सेंद्रीय शेती केंद्र आणि इतर अनेक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याला नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. आज महापालिकेत आयुक्तासमोर टेकडीवरील विकासकामांच्या प्रकल्पाचे सादरीकरण होते. यावेळी आयुक्त सौरव राव, नगरसेवक आबा बागुल, अश्विनी कदम, सुभाष जगताप, साईदिशा माने, पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर, सत्या नटराजन, मकरंद शेंडे, पुष्कर कुलकर्णी, आर्किटेक्चर आनंद उपळेकर, हेमंत बागुल, पालिका अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
पर्यावरणप्रेमींनी सुरुवातीला टेकडीवरील विकासकामांचा प्रकल्प कधी मंजूर झाला, कसा मंजूर झाला असे प्रश्न विचारले. त्यावर पालिका अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आले नाही. टेकडीवरील प्रकल्प अंतिम झालेला नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी 2018 मध्ये सल्लागाराची नेमणूक केली होती. जर सल्लागार नेमला, तर मग नागरिकांशी किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला का घेतला नाही, असा सवाल उपस्थित केला. तेव्हा प्रकल्प अंतिम झालेला नाही. त्यावर चर्चा करता येईल आणि बदल करता येईल, असे आबा बागुल यांनी सांगितले. नागरिक आणि तज्ज्ञांशी बोलून प्रकल्प पुढे नेऊ, असे ते म्हणाले.
अश्विनी कदम म्हणाल्या, लोकांच्या भावनेचा विचार केला पाहिजे. त्यांना टेकडीवर कसलेही काँक्रिटीकरण नको आहे, तर त्याचा विचार व्हावा. सत्या नटराजन म्हणाले, टेकडीवर वृक्ष तोड होत आहे. तिचे सौंदर्य नष्ट केले जात आहे. टेकडीवर बांधकाम करता येत नाही हा नियम आहे. मग तरी बांधकाम कसे झाले? कायद्याचे उल्लंघन होत आहे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.
पुष्कर कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीत नागरिकांचा विचार करणे आवश्यक असते. लोकांना टेकडीवर कसलाही विकास नको आहे. लोकांच्या कररूपी पैशांचा विनाकारण चुराडा करू नये. पैसे योग्य ठिकाणी खर्च व्हावेत.
विकास नको आम्हाला...
टेकडीवर विकास करायचा आहे. तुम्हाला विकास हवा की, नको, असे आबा बागुल यांनी मोठ्याने सर्वांना विचारले. तेव्हा सर्व नागरिकांनी मोठ्या आवाजात टेकडीवर विकास नकोय आम्हाला!, असे ठणकावून सांगितले.
आयुक्तांना निवेदन
टेकडीवर सुरू असलेले काँक्रिटीकरण थांबवावे आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पालिका आयुक्त सौरव राव यांना पर्यावरणप्रेमींनी यावेळी दिले. त्यानंतर टेकडीचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.