कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:42 PM2023-02-15T18:42:44+5:302023-02-15T18:43:04+5:30
कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून राज ठाकरेंनी सुद्धा मविआला विनंती केली होती
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर भाजपचे नेते प्रचारासाठी पुण्यात येऊ लागले आहेत. आजही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंनाही प्रचारात सहभागी होण्याची विनंती करणार असल्याचे सांगितली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ,कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही विनंती केली होती. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केली नाही. पण राज ठाकरे यांनी आमची विनंती मान्य केली. राज ठाकरे यांनी प्रचारात सहभागी व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ते येत नसतील तर त्यांचा प्रतिनिधी तरी प्रचारासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहे. राष्टवादीचे जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे किंवा विरोधीपक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री व्हावे हा त्यांचा अंर्तगत प्रश्न आहे. मात्र त्यांचा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही. शिवसेनेचे नुकसान करून २०१९ मध्ये १०० आमदार निवडून आणण्याचे आदेश होते, आता २०२४ मध्ये बघूया कुणाचा मुख्यमंत्री होतो ते, असंही बावनकुळे यांनी सांगितले.
शहा यांचा दौरा नियोजित
कसब्याचं आम्हाला आव्हान नसून आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेत असतो. कसब्यात केंद्रीय पातळीवरून कुणीही प्रचारासाठी येणार नाही. राज्य पातळीवरचे नेते प्रचारासाठी येतील. अमित शहा यांचा दौरा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही. शाह यांचा दौरा नियोजित होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरें यांच्या सभांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असच म्हटलं गेलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं आहे. सूड भावनेने कधी काम केलं नाही पण फडणवीस यांचा विश्वासघात केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.
भीमाशंकर बाबत काय दावा करायचा तो करू द्या, आपली श्रद्धास्थान कायम
आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर या देवस्थानावर दावा केला आहे. त्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आसाम सरकारला काय दावा करायचा तो करूद्या. मात्र आपली श्रद्धास्थान कायम राहणार आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.ज्या विरोधकांनी उद्योगांसाठी एकही बैठक घेतली नाही. ते आता उद्योग गेला म्हणत आहेत. फक्त बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. पण एकही पेपर दाखवू शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.