अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:23+5:302021-04-22T04:11:23+5:30
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावीच्या निकालासंदर्भात बुधवारी शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या ...
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावीच्या निकालासंदर्भात बुधवारी शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीस राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.वसंत काळपांडे आदी उपस्थित होते. यावेळी तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आदी राज्यांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा अभ्यास करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नववीच्या गुणांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देता येतील का ? केवळ शिक्षकांनी घेतलेल्या अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करणे शक्य का?, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका द्यावी की देऊ नये, इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑफलाइन पद्धतीने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाकडे प्रवेशाचे अधिकार द्यावेत का ? पुणे-मुबंईतील नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेऊन प्रवेश द्यावेत का? अशा विविध मुद्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. मात्र, निकालाबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही.
--
परीक्षेचे वेगळे पर्याय
केवळ अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केल्यास विद्यार्थी व पालकांकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात काही प्रश्नांवर आधारित चाचणी परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांनी चाचणी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे घरी बसून लिहून ऑनलाइन पद्धतीने शाळांना पाठवावी. त्यामुळे परीक्षा घेतल्याचा पुरावा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेच्या त्या-त्या विषय शिक्षकांने ऑनलाइन पद्धतीने एमसीक्यू प्रश्नांवर आधारित चाचणी परीक्षा घेऊन त्यात मिळालेले गुण राज्य मंडळाकडे पाठवावे. राज्य मंडळाने शाळांनी पाठवलेले गुण शंभर गुणांमध्ये परावर्तित करावे आणि त्या आधारे दहावीचा निकाल लावावा, असेही मत शिक्षण क्षेत्रातील तजांकडून व्यक्त केले जात आहे.