संमेलनाध्यक्षपदाची निवड सन्मानाने होणार का? लक्ष्मीकांत देशमुख यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 05:18 PM2018-10-15T17:18:21+5:302018-10-15T21:25:26+5:30
काही दिवसांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्षाची निवड सन्मानपूर्वक करण्याचा निर्णय मराठी साहित्य परिषदेने घेतला होता.
पुणे : अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड सन्मानान होणार का, असा सवाल माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी साहित्य संमेलनाचा अध्यक्षाची निवड सन्मानपूर्वक करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता .
यवतमाळच्या संमेलनापासून अंमलात येणार असलेली अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुकीची आणि अध्यक्षांची सन्मानाने निवड या घटनादुरुस्तीच्या मूळ हेतूला काळिमा फासणारी आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महामंडळावर ताशेरे ओढले आहेत. ही प्रक्रिया रद्द करुन महामंडळाने दरवर्षी पाच मान्यवर साहित्यिक आणि विचारवंतांची एक समिती स्थापन करुन त्यांच्यामार्फत एका मान्यवर साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड करावी, असा पर्याय सुचवून देशमुख यांनी नव्या घटनादुरुस्तीची मागणी पत्राद्वारे महामंडळाकडे केली आहे. प्रत्यक्ष निवडीपूर्वीच मतभेद निर्माण झाल्याने २८ आॅक्टोबर रोजी होणारी बैठक वादळी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेतली जाणारी निवडणूक रद्द होऊन यंदाच्या संमेलापासून अध्यक्षांची निवड सन्मानाने केली जाणार, असा ऐतिहासिक निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. त्यानुसार महामंडळाच्या घटनेमध्ये दुरुस्तीही करण्यात आली. निवड प्रक्रियेनुसार, चार घटक संस्थांनी प्रत्येकी तीन नावे, संलग्न संस्थांनी प्रत्येकी एक, निमंत्रक संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांनी प्रत्येकी एक अशी वीस नावे महामंडळाला सुचवायची आहेत. त्यापैकी एक नाव एकमत किंवा बहुमताने शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित नावांचा सन्मान राखला जाणार नाही, अशी तीव्र नाराजी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. महामंडळाने निवडीच्या कामातून स्वत:ला अलग ठेवावे, म्हणजे कोणत्याही साहित्यबाह्य निकषाविनाा संमेलनाध्यक्षाची निवड होऊ शकेल.
देशमुख म्हणाले, ‘वीस नावांमधून बहुमताने महामंडळ सदस्यांनी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया निवड न झालेल्या साहित्यिकांचा सन्मान राखणारी नाही. ती रद्द करुन महामंडळाने दरवर्षी पाच मान्यवर साहित्यिक आणि विचारवंतांची समिती स्थापन करुन त्यांच्यामार्फत एका मान्यवर साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदासाठी निवड करावी. या समितीने निवडलेल्या साहित्यिकांची निवड का केली, याची एक टिपण्णी सह्या करुन द्यावी. ही निवड वाड,मयीन गुणवत्तेचे कोणते निकष लावून केली, याची कारणमींमासा द्यावी. यामुळे अध्यक्ष म्हणून एकाची सन्मानाने निवड होईल आणि कोणतेही वादविवाद होणार नाहीत.
त्याऐवजी पाच विचारवंतांची समिती नेमून त्यांनी संमेलनाध्यक्ष निवडावा, असा पर्याय त्यांनी महामंडळाला पत्राद्वारे सुुचवला आहे. त्यादृष्टीने महामंडळामधील घटनादुरुस्तीचा प्रस्ताव चर्चेला घेण्याचे त्यांनी सुचवले आहे.