शरद पवार ‘डाकू सरकार’चे समर्थन करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:26+5:302021-09-10T04:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवसेना खासदार भावना गवळी यांनी १५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. अनिल देशमुख, अनिल ...
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवसेना खासदार भावना गवळी यांनी १५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर राज्य सरकारमधल्या आणखी एका ‘अनिल’च्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार आहे. उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात कॅॅबिनेट मंत्री असणाऱ्या या तिसऱ्या ‘अनिल’ची कागदपत्रे हाती आली आहेत,” असा दावा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
“ईडी राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात. पण महाआघाडीचे राज्य म्हणजे स्वत:च लूटमार करणाऱ्या डाकूंचे सरकार असल्याने ईडीचे काम वाढले आहे,” असे सोमय्या म्हणाले. महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी या वेळी उपस्थित होते.
“बावीस वर्षे खासदार असणाऱ्या गवळी सांगतात की ७ जुलै २०१९ रोजी त्यांच्या कार्यालयातून सात कोटी रुपये चोरीला गेले. याची तक्रार त्या मे २०२० मध्ये देतात. पोलीस ती नोंदवूनही घेतात. पण हे पैसे आले कुठून हे त्यांना विचारत नाहीत. गवळींना वाचवायचे असेल तर पवारांनी तसे खुलेआम सांगावे,” असे सोमय्या म्हणाले. जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव ६५ कोटी रुपयांमध्ये होतो. ही किंमत ठरवणाऱ्या ‘व्हॅॅल्युएटर’ आणि कारखान्याचे ‘व्हॅॅल्युएशन’ अजित पवारांनी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
चौकट
खरमाटेकडे साडेसातशे कोटी
“शिवसेना नेते अनिल परब यांचा निकटवर्तीय बजरंग खरमाटे याच्याकडे फार्म हाऊस, शोरुम, मॉल्स अशा विविध स्वरुपात साडेसातशे कोटी रुपये बाजारमूल्य असलेली संपत्ती आहे. त्याची ईडी चौकशी झाली आहे. दोन-तीन आठवड्यांत कारवाई होईल. खरमाटे आणि परब यांच्यात व्यवहार झाल्याची कागदपत्रे हाती आली आहेत,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
अनिल परब मंत्री कसे?
शिवसेना नेते अनिल परब यांचे अलिबागमधील रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केली होती. ती मान्य करण्यात आली. त्यानंतर हे बेकायदेशीर रिसॉर्ट पाडून टाकण्याची परवानगी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी लागली. पण असे बेकायदा काम करणारा माणूस मंत्री कसा राहू शकतो, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी केला.