जनता सरकारला जागा दाखवेल - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 02:16 AM2018-08-27T02:16:05+5:302018-08-27T02:16:30+5:30
चेतन तुपे यांच्या सत्कार प्रसंगी शासनाच्या धोरणावर केली चौफेर टीका
हडपसर : भाजपा सरकारने ‘अच्छे दिन’च्या गोंडस नावाखाली जनतेची दिशाभूल केली आहे. या सरकारने महागाई वाढवली व सामान्य लोकांचे जीवन अडचणीत आणले आहे. या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात जनता रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात पालिकेतील विरोधीपक्ष नेतेपदी व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड झाल्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार-समिती आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात विधानसभा विरोधीपक्ष नेते मुंडे बोलत होते. या वेळी माजी आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पक्षाचे जालिंदर कामठे, सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, मंगलदास बांदल, कैलास कोद्रे, वासंती काकडे, संगीता घुले, रतन काळे यासह या भागातील राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक व पक्षांचे पदाधिकारी यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारला उत्तर देताना शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, जातियवादी शक्तीच्या तावडीतून मुक्त करणे हेच उद्दिष्ट आहे. इथल्या सामान्य जनतेला राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन यासाठी आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मला ताकद द्यावी. असे सांगितले. तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास कोद्रे यांनी सांगितले की, पक्षात नवतरुणांना संधी आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वसात घेतील.
या वेळी राजलक्ष्मी भोसले, जालिंदर कामठे, सुरेश घुले व राहुल शेवाळे आदींचा सत्कार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वैराळकर यांनी व आभार डॉ. अमित तुपे यांनी मानले.
धर्माच्या नावावर दंगली घडविणारे सरकार
पुढे मुंढे म्हणाले की, सध्या सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्या मनात चीड आहे. हे सरकार शोषण करणारे आहे. या सरकारने माणसा-माणसांत धर्माच्या नावावर दंगे लावून अस्थिरता माजविण्याचे काम केले. दिल्लीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना जाळण्यापर्यंत मजल जाते. हे खऱ्या अर्थाने गरीब-कामगाराला न्याय्य हक्कापासून गुलाम बनविण्याचे षडयंत्र भाजपा सरकारचे आहे. या विरोधात राष्ट्रवादी पक्षाला काम करायचे आहे. यासाठी पुण्याच्या शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड केली. आगामी काळात सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची ताकद मजबुत करा, असे आवाहन या वेळी केले.