खोरचा पाणीप्रश्न सोडविणार
By admin | Published: April 25, 2017 03:53 AM2017-04-25T03:53:38+5:302017-04-25T03:53:38+5:30
सांसद आदर्श ग्राम योजनेतून खोर (ता. दौंड) या दत्तक घेतलेल्या गावाचा पाणीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार वंदना चव्हाण यांनी दिले आहे.
खोर : सांसद आदर्श ग्राम योजनेतून खोर (ता. दौंड) या दत्तक घेतलेल्या गावाचा पाणीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार वंदना चव्हाण यांनी दिले आहे.
चव्हाण यांनी शनिवारी खोरला भेट देऊन सांसद आदर्श ग्राम योजनेतून कोणकोणती विकासकामे प्राधान्यांनी करता येतील, याविषयी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. खोर हे गाव गेल्या वर्षापासून पाण्याच्या प्रश्नावर लढत आहे. या गावाच्या उशाला असलेल्या सिंचन योजनेतून पाणी मिळावे, म्हणून ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. परंतु अद्यापपर्यंत या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यश आले नाही.
दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामचंद्र चौधरी, पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे, सरपंच सुभाष चौधरी यांनी सांसद आदर्श योजनेतून खोर गावचा पाणीप्रश्न मार्गी लावला तरी हे गाव आदर्श होईल.
या वेळी खासदार वंदना चव्हाण यांनी खासदार निधीतून तरतूद करून जनाई-शिरसाई योजनेतून कायमस्वरूपाची बंदिस्त पाईपलाईन पद्मावती तलावापर्यंत आणणार असल्याचे सांगितले तर दुसरीकडे पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावापर्यंत बंदिस्त पाईपलाईन करून पाणी आणणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या वेळी तहसीलदार विवेक साळुंखे, कृषी विभागाचे जरांडे, मधुकर चव्हाण, सुहास चौधरी, शिवाजी चौधरी, बाळू डोंबे, निवृत्ती चौधरी, संजय डोंबे, सोपान शेंडगे, भगवानराव चौधरी, दिलीप डोंबे, मारुती चौधरी, संजय डोंबे, तलाठी रमेश कदम, ग्रामसेवक अशोक लोणकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
(वार्ताहर)