हमीभावा एवढा तरी सोयाबीनला दर मिळेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:32+5:302021-09-24T04:11:32+5:30

रविकिरण सासवडे लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीन पेंड आयातीला ...

Will soybeans get such a guaranteed price? | हमीभावा एवढा तरी सोयाबीनला दर मिळेल काय?

हमीभावा एवढा तरी सोयाबीनला दर मिळेल काय?

Next

रविकिरण सासवडे

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिल्याने सोयाबीनचे बाजारभाव गडगडले आहेत. बारामती बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल २ हजार ३०० रुपयांनी बाजारभाव खाली आला आहे. सध्या सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये हमीभाव आहे. दरातील घसरण अशीच सुरू राहिली तर हमीभावा एवढा तरी सोयाबीनला दर मिळेल काय? याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

राज्यात यंदा पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीन क्रमांक एकचे पीक ठरले आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १८८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे. बाजारामध्ये सोयाबीन तेजीत असल्याने यंदाच्या वर्षी देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. अगदी १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मात्र मागील महिन्यात २४ ऑगस्टला जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार देशात १२ लाख टन कुटलेली व जीएम गटातील सोयापेंड आयात करण्यास मान्यता दिली आहे. सोयाबीनपेंडच्या आयातीला दिलेली मान्यता शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेल. त्यामुळे सोयापेंड आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्रालयाला याबाबतचे पत्र दिले आहे.

-------------------------------

मागील आठवड्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री आणि वाणिज्य मंत्री यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक झाली आहे. यावेळी सोयापेंड आयतीमुळे बाजारातील सोयाबीनच्या दारावर झालेला परिणाम ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांना लेखी पत्राद्वारे देखील या आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच यंदा सोयाबीनचा पेरा दुप्पट नाही. दर वर्षी कापूस आपल्यकडे क्रमांक एकचे पेरणीक्षेत्र असलेले पीक ठरते मात्र महाराष्ट्रात यंदा सोयाबीन क्रमांक एकचे पीक ठरेल.

- दादा भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र

--------------------------

विक्रीची घाई नको; दर नक्की वाढतील...

सोयाबीनचा पेरा महाराष्ट्रात वाढला असला, तरी राष्ट्रीय पातळीवर मात्र उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही. राष्ट्रीय पातळीवर मागच्या वर्षीच्या तुलनेत फक्त २ लाख टनाचा फरक आहे. सोयाबीन विकण्याची गडबड शेतकऱ्यांनी सध्या करू नये. १२ लाख टन सोयापेंड आयात केल्याच्या निर्णयामुळे त्याचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. चुकीच्या वेळी ही आयात केंद्र सरकारने केली आहे. हीच आयात केंद्र सरकारने सहा-सात महिन्यांपूर्वी केली असती तर त्याचा फायदा पोल्ट्री व्यावसायिकांना झाला असता. मात्र, सध्याच्या आयातीचा फायदा पोल्ट्री व्यावसायिकाला नाही, तसेच शेतकऱ्यांना देखील होणार नाही. सरकारने जर आपला निर्णय बदलला तर दरामध्ये वाढ होईल. मात्र आमच्या माहितीनुसार हे फार काळ चालणार नाही. एकूण १२ लाख टन सोयापेंडीच्या आयातीऐवजी केवळ ५ लाख टन सोयापेंड आयात होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता इतक्यात सोयाबीनची विक्री करू नये. पुढील काळात सोयाबीनचे दर नक्की ८ ते ९ हजारांपर्यंत जातील. आम्ही देखील संघटनेच्या माध्यमातून वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या सोयाबीनवर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावीत यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

---------------------------

दर पाडण्यासाठी आयात धोरणाचा हत्याराप्रमाणे वापर...

दर वर्षी सरकार शेतमालाचे दर पाडण्यासाठी हत्याराप्रमाणे आयात धोरणाचा वापर करते. निर्यातबंदी करणे, आयात करणे आणि दर पाडणे या सूत्रामुळे लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या धोरणामुळे झाल्या आहेत. दर वर्षी हा प्रकार होतो. हे काही नवीन नाही. महाराष्ट्रात जरी सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये वाढ झाली असली तरी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये नुकसानही प्रचंड प्रमाणात झाले आहे. पेरणी झाली तेवढे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे, असे नाही. अधिक उत्पन्न झाले आणि दर पडले असे नाही तर आयातीमुळे सध्याचे दर पडले आहेत.

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

Web Title: Will soybeans get such a guaranteed price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.