उच्च व तंत्र शिक्षणामध्ये शेती शिक्षणाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार; उदय सामंत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:27 PM2022-02-13T14:27:04+5:302022-02-13T14:27:29+5:30
बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे
बारामती : बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे. कोकण विभागासाठी येथील माशांची शेती तसेच बांबू उत्पादनापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू उपयोगाच्या आहेत. अॅग्रीकल्चरलमधील तांत्रिक गोष्टी माझ्या विभागाकडे बसतील का? शेती शिक्षणाबाबत उच्चतंत्रशिक्षणामध्ये काही तरतुदी करता येतील का? याबाबत आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बारामती येथे सुरू असलेल्या कृषी सप्ताहास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सामंत म्हणाले, १२ वी आणि सिईटी बाबत आम्ही एक समिती नेमली होती. यासमितीचा अहवाल आला आहे. यामध्ये १२ वीचे मार्क आणि सिईटीचे मार्क ५० - ५० टक्के करता येतील का यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकच याबाबत निर्णय होईल. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांवर असलेला सिईटीचा ताण कमी करता येऊ शकेल. कोरोनाच्या संकटतून आपण बाहेर पडत आहोत. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वीच्या परीक्षांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. दहावी-बारावी हे करिअर घडवण्याचे वय आहे. या वयात कोणत्या भाऊचं ऐकू नका आपल्या पालकांचे व शिक्षकांचेच ऐका, असा सल्ला उदय सामंत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला. कोणाच्या तरी आवाहनाला बळी पडून विद्यार्थ्यांनी स्वत:च्या करिअर परिणाम करू नये. वेगवेगळी नावे विकास पाटक सारख्या व्यक्तीला जोडून उगीचच काही मंडळी त्यांचे महत्त्व वाढवतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.