‘गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’
By admin | Published: April 26, 2017 02:50 AM2017-04-26T02:50:57+5:302017-04-26T02:50:57+5:30
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिला.
जुन्नर : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिला.
जुन्नर येथे पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित खरीप हंगाम नियोजन आढावा व पाणीटंचाई आढावा बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवकाते म्हणाले, की पाण्याचे योग्य नियोजन व टंचाईबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे. आमदार शरद सोनवणे म्हणाले, की तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधल्यास आदिवासी भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, यासाठी तालुक्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी सभापती सुजाता पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.