Monsoon Update: आतापर्यंत पावसाचा खंड; सोमवारपासून जोर वाढणार का? काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: June 23, 2024 03:25 PM2024-06-23T15:25:21+5:302024-06-23T15:25:35+5:30
यंदा देशामध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, मॉन्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात पोचला, तरी देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
पुणे : मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, त्याची पुढील वाटचाल होण्यासाठी देखील पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या आठवड्यात पावसाने पुणे शहर व जिल्ह्यात विश्रांती घेतली हाेती. पण आता या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
यंदा देशामध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मॉन्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात पोचला आहे. तरी देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत पावसाचा खंड होता. तो आता खंड संपून सोमवारपासून (दि.२४) पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात ‘ला निना’ सक्रिय होण्यास सुरवात होईल, त्यामुळे चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सध्या घाट माथ्यावर पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरामध्ये जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर डुंगरेवाडी, अबोणे या ठिकाणी देखील शंभर मिमीहून अधिक पाऊस झाला आहे.