पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

By विश्वास मोरे | Published: September 16, 2022 06:13 PM2022-09-16T18:13:42+5:302022-09-16T18:40:05+5:30

शिंदे गटाला दोन जागा मिळणार की भाजपात प्रवेश करावा लागणार, भाजपात विद्यमानांमध्ये अस्वस्थता

Will the Shinde group prevail in Pune What will happen to the aspiring candidates of BJP | पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

Next

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हातील शिरूर, बारामती या मतदार संघांवर भाजपाने लक्षकेंद्रीत केले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मावळ शिंदे गटास मिळाल्यास आढळरावांचे काय होणार? ही जागा शिंदे गटाला मिळणार की? या जागेसाठी आढळराव भाजपात प्रवेश करणार? अशीही चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.

लोकसभा निवडणूकीची सर्वच राजकीय तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. ज्याठिकाणी २०१९ च्या निवडणूकीत भाजपाचा उमेदवार नव्हता, अशा देशातील १४४ मतदार संघांची यादी भाजपने केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदार संघांचा आणि पुणे जिह्यातील शिरूर आणि बारामती या मतदार संघांचा समावेश आहे. त्यावर भाजपाने लक्षकेंद्रीत केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री तळठोकून आहेत.

शिंदे गटाला दोन जागा देणार? विद्यमानांची घालमेल

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी घरोबा करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर राज्यातील १२ खासदार आणि माजी खासदार शिंदे गटाबरोबर गेले आहेत. त्यात पुणे जिल्हयातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांचा समावेश आहे. शिरूरमधून भाजपाकडून रिंगणात उतरण्यास आमदार महेश लांडगे इच्छुक आहेत. तर मावळमधून आमदार लक्ष्मण जगताप हे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. दोन प्रबळ इच्छुक असताना दोन्ही जागा भाजपा शिंदे गटाला देणार का? शिंदेगटाला भाजपात सामावून घेणार याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाचा दावा दोन जागांवर होणार असल्याने भाजपातील स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे.

पवार आणि समर्थकांना शह देण्यासाठी रणणिती

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या खासदार आहेत. तर शिरूरमधून पवार समर्थक डॉ अमोल कोल्हे हे खासदार आहेत. मावळमधून गेल्या निवडणूकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार पराभूत झाले. त्यामुळे तीन जागांवर पवार आणि समर्थकांना नामोहरम करण्यासाठी भाजपाची मतदार संघ निहाय नियोजन केले आहे. त्यामुळे भाजपाचे मोठे आव्हान या तीनही जागांवर असणार आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तगडे आव्हान

शिरूर मतदार संघातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि भोसरी सहा पैकी पाच जागांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर भोसरीत भाजपचा आमदार आहे. बारामती मतदार संघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासलापैकी दोन आमदार राष्ट्रवादी, प्रत्येकी दोन आमदार भाजप आणि काँग्रेसचे आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी, मावळ मतदार सघात राष्ट्रवादीचे आमदार, तर चिंचवड, पनवेल, कर्जत, उरण या मतदार संघात सहा पैकी दोन मतदार संघात राष्ट्रवादीचे, दोन मतदार संघात भाजपाचे आणि एका ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहेत. आमदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपासमोर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. तसेच शिवसेनेतील गटांचाही प्रभाव असणार आहे.

Web Title: Will the Shinde group prevail in Pune What will happen to the aspiring candidates of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.