Temperature: राज्यात मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अजून गरम होणार? मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 01:59 PM2022-04-03T13:59:01+5:302022-04-03T13:59:15+5:30
पुणे : मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात अधिक गरमी असू शकते, असा हवामान विभागाने दिलेला इशाऱ्याचा प्रत्यय एप्रिल महिन्याच्या पहिल्या ...
पुणे : मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात अधिक गरमी असू शकते, असा हवामान विभागाने दिलेला इशाऱ्याचा प्रत्यय एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत येत असून विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये बुधवारी व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १५.६ अंश सेल्सिअस आहे.
विदर्भातील अकोला, चंद्रपूर, अमरावती या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंशाचे पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ३९.७, लोहगाव ३९.६, कोल्हापूर ३८.३, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.७, सांगली ४०.२, सातारा ३९.५, सोलापूर ४२.८, मुंबई ३२.७, सांताक्रूझ ३१.८, रत्नागिरी ३१.६, पणजी ३३.३, डहाणू ३३.७, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.२, नांदेड ४१.८, अकोला ४३.५, अमरावती ४२, बुलडाणा ४०.२, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, नागपूर ४१.१, वाशिम ४१, वर्धा ४२.४.