पुण्यात आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र होणार का? स्वमालकीच्या जागेची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:19 IST2024-12-25T11:18:57+5:302024-12-25T11:19:30+5:30

पुण्यासारख्या प्रगत मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात तब्बल आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९७ उपकेंद्रांना स्वतःच्या मालकीची जागाच नसल्याची माहिती समोर

Will there be a health center and sub-center in Pune? Waiting for self-owned land | पुण्यात आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र होणार का? स्वमालकीच्या जागेची प्रतीक्षा

पुण्यात आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र होणार का? स्वमालकीच्या जागेची प्रतीक्षा

पुणे : पाच लाख रुपयांपर्यंतच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा; मात्र उपचार करण्यासाठी आधी सुसज्ज अशी आरोग्य केंद्र तर हवी ! पुण्यासारख्या प्रगत मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात तब्बल आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९७ उपकेंद्रांना स्वतःच्या मालकीची जागाच नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडून निधी देऊ केला जात असताना केवळ जागेचा अभाव आणि स्थानिक नेते, अधिकारी यांची अनास्था यांमुळे आरोग्य केंद्र व उपकेंद्र होऊ शकत नसल्याचे चित्र पुणे जिल्ह्याचे आहे.

अनेक नेत्यांकडून प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा उपकेंद्र मंजूर करून घेतल्याचे सांगत श्रेयवाद लाटला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र केंद्र बांधायचे कुठे, असा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे केवळ कागदावर मंजुरी आणि प्रत्यक्षात मात्र जागाच नाही, अशी स्थिती सुमारे प्रत्येक तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे शासनाने आता विविध संस्थांकडून प्रस्ताव येताना त्यांच्याकडून जागा असेल तर आरोग्य केंद्राला मंजुरी देण्याचा नियम केला गेला आहे. त्यासाठी जागेची कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणचे आरोग्य केंद्र व उपकेंद्र आता जागेअभावी अडकली आहेत. सध्या जागा नसलेली आरोग्य केंद्रे ग्रामपंचायत इमारतीमधील खोली, अंगणवाडीची खोली याशिवाय इतर सरकारी जागांमध्ये सुरू आहेत. जिल्हा परिषदेकडूनही जागा भूमी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील आठ आरोग्य केंद्रांना स्वत:ची जागा नसल्याने त्या भाडेतत्त्वावर इतर जागेमध्ये सुरू आहेत. त्यामध्ये हवेली, इंदापूर, शिरूर या तालुक्यातील प्रत्येकी एक आरोग्य केंद्र आहे; तर पुरंदरमधील तीन आणि वेल्हा तालुक्यातील दोन आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीचा पुढाकार हवा

गावागावांत आरोग्य केंद्र उभे केल्यानंतर ग्रामस्थांनाच त्याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे. मात्र केवळ गावागावांत आरोग्य केंद्रांना स्वमालकीची जमीन नसल्याने ग्रामस्थांना त्याचा तोटा होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांकडून आरोग्य केंद्रांना आरोग्य केंद्रासाठी जागा मिळावी अशी इच्छा आहे.

- प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या - १०८
- उपकेंद्रांची संख्या - ५३९
- जागा उपलब्ध नसलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे - ८
- जागा उपलब्ध नसलेली उपकेंद्रे - ९७

जागा नसलेल्या उपकेंद्रांची संख्या

आंबेगाव ४, बारामती ५, भोर ६, दौंड ५, इंदापूर १३, हवेली २१, जुन्नर ७, खेड ८, मावळ १२, मुळशी ८, पुरंदर २, शिरूर ५, वेल्हा १.

Web Title: Will there be a health center and sub-center in Pune? Waiting for self-owned land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.