Ramdas Athawale: राज्यात युती येणार की आघाडी? रामदास आठवलेंनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:54 PM2024-11-14T17:54:27+5:302024-11-14T17:55:07+5:30
'महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास नसून राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेत येणार' रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास
पुणे : सध्या सत्तेमध्ये असणारे महायुतीच्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या प्रेमात आहेत. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारवेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते पुढे म्हणाले,' सध्या सत्तेमध्ये असणारे महायुतीच्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या प्रेमात आहेत. तर महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे.
मोदी सरकारच्या कामाचे कौतूक करत आठवले पुढे म्हणाले,'केंद्रात सत्तेमध्ये असणारे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये महायुतीला मोठा विजय मिळेल. देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा लौकिक मोठा आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. सिद्धार्थ शिरोळे यांनी आमदार म्हणून केलेल्या कामाचे आठवले यांनी यावेळी कौतुक केले.
दरम्यान, 'पुण्यातील शिवाजीनगरचे नागरिक आहेत भोळे, इथे निवडून येणार आहेत सिद्धार्थ शिरोळे’ अशी चारोळी रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत सादर केली.
तत्पूर्वी, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी दुहेरी लढत होणार आहे. तसेच काँग्रेसचे बंडखाेर मनीष आनंद शिवाजी नगर रिंगणात उतरले आहे. मागील निवडणुकीत भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना ५८,७२७ मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ५३,६०३ मते मिळाली. सिद्धार्थ शिरोळे यांचा ५,१२४ मतांनी विजय झाला होता.