हैद्राबादसारखा सिग्नल पुण्यात हाेणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 07:43 PM2019-07-08T19:43:52+5:302019-07-08T19:44:56+5:30
हैद्राबादप्रमाणे डिजीटल सिग्नल यंत्रणा पुण्यात राबवता येईल का याबाबत वाहतूक शाखेकडून चाचपणी सुरु आहे.
पुणे : सध्या साेशल मीडियावर हैद्राबाद येथील केबीआर पार्क जंक्शन या चाैकात लावण्यात आलेल्या रिफलेक्टरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल हाेत आहे. या चाैकामध्ये सिग्नल यंत्रणा रिफलेक्टर बसवून हाताळण्यात येत आहे. प्रायाेगिक तत्त्वावर हा प्रयाेग तिथे करण्यात येत आहे. साेशल मीडियावर व्हायरल हाेणारा व्हिडीओ पाहून हैद्राबादच्या कंपनीशी पुणे वाहतूक शाखेने संपर्क केला आहे. पुण्यातही असा प्रयाेग शक्य आहे का याबाबत विचार सुरु आहे.
पुण्याच्या वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली आहे. सातत्याने वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे रस्ते अपुरे पडत आहेत. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक काेंडीत भर पडत आहे. यावर उपाय म्हणून पुणे वाहतूक शाखेकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नियमभंग कऱणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. अशातच हैद्राबाद सारखा उपक्रम पुण्यात राबविता येईल का याबाबत पुणे वाहतूक शाखेकडून चाचपणी करण्यात येत आहे. हैदराबाद शहरातील केबीआर जंक्शन चौकामध्ये नूकताच डिजीटल पध्दतीच्या सिग्नल यंत्रणेचा प्रयोग सुरु आहे. चौकातील झेब्रा क्रॉसिंगवर रिफ्लेक्टरच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा हाताळण्यात येत आहे. ही यंत्रणा एका आयटी कंपनीच्या माध्यमातून सुुरु करण्यात आली असून याचा वाहनचालकांबरोबरच रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना फायदा होत आहे. सध्याच्या सिग्नलप्रमाणेच ठरावीक सेकंदाने या रिफ्लेक्टरचा कलर बदलत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांकडून एक नवीन प्रयोग करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने हैदराबाद पोलिसांमार्फत सिग्नल यंत्रणा बसवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आहे. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्यांशी मेलव्दारे संपर्क साधून पुण्यामध्ये अशाप्रकारे सादरीकरण करण्याविषयी विनंती करण्यात आली आहे. पोलिसांच्या मागणीला प्रतिसाद देत आज (दि.८) कंपनीतील अधिकारी पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. ही प्रक्रिया अगदीच प्राथमिक टप्प्यात असून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.