नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : अमितेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:46 PM2024-02-02T14:46:41+5:302024-02-02T14:46:59+5:30

अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेश कुमार यांची बुधवारी (दि. ३१) पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली...

Will try to keep Pune safe through citizens' participation: Amitesh Kumar | नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : अमितेश कुमार

नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : अमितेश कुमार

पुणे : शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंगबरोबरच गुन्ह्याचा शोध, वाहतूक मॅनेजमेंट, महिला आणि मुलांची सुरक्षा, सायबर गुन्ह्यांबाबत जागृती आणि अटकाव, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थांना पायबंद आणि व्हीआयपी मूव्हमेंट हा सात कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि. १) व्यक्त केला.

अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेश कुमार यांची बुधवारी (दि. ३१) पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी सायंकाळी रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमितेश कुमार म्हणाले की, ‘नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण, तसेच त्यांच्याबरोबर सकारात्मक संवाद ठेवण्याची आमची प्राथमिकता राहील. गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, शहरात जे अंमली पदार्थाचे हॉटस्पॉट आहेत, त्याच्याकडे आमचे लक्ष राहील. व्हिजिबल पोलिसिंग कसे वाढविता येईल याच्यावर माझा भर असेल. अतिरेकी कारवाया होऊ नये यासाठी आमचे प्राधान्य असेल. सामान्य जनतेला सोबत घेऊन आमचा काम करण्याचा मानस राहील असेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले आयुक्त ?

- क्राईम नियंत्रणाच्या दृष्टीने दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याचा वापर करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई केली जाईल.

- शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील टॉप २० गुन्हेगारांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाईल.

- कॅमेरा आधारित वाहतूक नियंत्रणावरही आमचा भर असेल, असेही ते म्हणाले.

- ट्रिपल सीट आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. हेल्मेट वापरण्याच्या संदर्भात आधी जागृती करण्यात येईल.

- सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल.

अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. सराईत गुन्हेगारावर मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई यापुढेही सुरू राहील. कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला पाहिजे. सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल, तसेच खासगी तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल, असेही अमितेश कुमार यांनी नमूद केले.

पुणेकरांनी भरघोस प्रेम दिले - रितेश कुमार...

माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निरोप समारंभाला उत्तर देताना, पुणे पोलिस आयुक्त म्हणून १३ महिन्यांचा कालावधी कमी होता. पण, पुण्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी माझ्यासह संबंध पुणे पोलिस दलाने चांगले परिश्रम घेतले. दहशतवाद्यांचे इसिससारखे मोड्यूल मोडून काढण्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा होता. यासोबतच विविध सण-उत्सव, कोरेगाव भीमा सारखा संवेदनशील बंदोबस्त कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता यशस्वी रीतीने पार पडला. मी पोलिस आयुक्त म्हणून १३ महिने होतो; मात्र या शहरात मी नऊ वर्ष विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. यात पुणेकरांचा वाटा मोठा आहे, त्यांनी मला भरघोस प्रेम दिल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.

Web Title: Will try to keep Pune safe through citizens' participation: Amitesh Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.