Muralidhar Mohol: महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न करणार - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 09:54 AM2024-06-14T09:54:54+5:302024-06-14T09:55:10+5:30

विमानतळांची संख्या वाढविणार, प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केद्रिंत करणार

Will try to speed up the airports in Maharashtra by empowering them Muralidhar Mohol | Muralidhar Mohol: महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न करणार - मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol: महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न करणार - मुरलीधर मोहोळ

पुणे : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा (State For Civil Aviation And Cooperation) पदभार स्वीकारला. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली. ‘देशभरातील विमानतळांची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल,’ असे मोहोळ यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर दोन दिवसांनी मोहोळ यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि १०० दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.

पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘ही खूप मोठी जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील हे महत्त्वाचे खाते आहे. या क्षेत्रात आव्हाने खूप असली, तरी गेल्या दहा वर्षांत या विभागात खूप मोठे काम झाले आहे. तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. मला आठवते आहे, पुण्याचा महापौर असताना पुण्याचे प्रश्न घेऊन इथे आलो होतो. मात्र, त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते, आपण समोरच्या खुर्चीवर कधी काळी बसू. भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी आहे. पुढच्या १० वर्षांमध्ये सगळे बदललेले असेल. जनतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, टर्मिनल सुरू करणे, नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचे विषय मार्गी लावणार आहोत. शिवाय महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे काम करताना महाराष्ट्राच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष होणार नाही.’

Web Title: Will try to speed up the airports in Maharashtra by empowering them Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.