दर महिन्याला करणार गडकिल्ल्यांची सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:33+5:302021-02-16T04:13:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सरकारी कार्यालयांमध्ये देखील कार्पोरेट कार्यालयासारखे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये फिटनेस व टीम स्पिरीट निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारी कार्यालयांमध्ये देखील कार्पोरेट कार्यालयासारखे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये फिटनेस व टीम स्पिरीट निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दर महिन्याला गडकिल्ल्यांची सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात राजगडा पासून केली आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्रांतअधिकारी सहकुटुंब सहभागी झाले होते.
गेल्या काही वर्षांत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची घडी काही प्रमाणात विस्कळीत झाल्यासारखी झाली होती. त्यात कोरोनाचे संकट आणि इतर महसुली कामांच्या रेट्यामुळे अधिकारी प्रचंड व्यस्त झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची एकूणच कार्यक्षमता वाढविण्यासाठी, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये टीम स्पिरीट निर्माण करावे, फिटनेस चांगला असेल तर कामाचा दर्जा वाढेल यासाठी दर महिन्याला एक दिवस सुट्टीच्या दिवशी सर्व विभाग प्रमुखांनी सहकुटुंब एकत्र येऊन ट्रेकिंग करणे, गडकिल्ल्यांना भेटी देणे, जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक, पर्यटन स्थळांच्या भेटी असे अनेक उपक्रम हाती घेणार आहेत. यातून जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक, ऐतिहासिक माहिती देखील अधिकाऱ्यांना होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी दिली.
--
अशा उपक्रमांमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, सर्व प्रांत अधिकारी यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासोबतच सांघिक कारगिरी चांगली होण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल.
- विजयसिंग देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे
फोटो : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांचे सर्व विभाग प्रमुखांनी राजगड किल्ल्याची सफर केली.