निष्पाप जीवांच्या मृत्यूनंतर आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 03:02 PM2022-07-26T15:02:13+5:302022-07-26T15:10:46+5:30
आळंदीत मागील आठ दिवसात डंपरच्या धडकेने दोन मोठे अपघात
भानुदास पऱ्हाड
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत मागील आठ दिवसात डंपरच्या धडकेने दोन मोठे अपघात घडून आले आहेत. या दोन्हीही अपघातांमध्ये दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे पहिल्या अपघातात धार्मिक शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी परजिल्ह्यातून आळंदीत आलेल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थी वारकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याआधीच मृत्यू झाला. तर सोमवारी (दि.२५) दुसऱ्या अपघातात अवघ्या चार वर्षीय चिमुकलीचे जीवन बहरण्याआधीच समाप्त झाले. वास्तविक दोघांचीही कुठलीही चूक नसताना त्यांना हे जग सोडून जावे लागले आहे. निष्पाप जीवांच्या मृत्यूनंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून संबंधितांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आळंदी शहरातील प्रदक्षिणा मार्ग व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत रस्ते चांगल्या दर्जाचे आहेत. मात्र बांधण्यात आलेल्या रस्त्यावर आवश्यक कुठेही गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. परिणामी अवजड वाहने भरधाव वेगाने रस्त्यावरून ये - जा करत आहेत. तर आलिशान चारचाकी गाड्याही वेगाने प्रवास करत आहेत. दरम्यान, शहरात सातत्याने नागरिकांची, भाविकांची, वारकऱ्यांची तसेच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे शहरात प्रवेश करतानाच खबरदारी म्हणून वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु बेजबाबदार डंपरचालक सुसाट वेगाने वाहने पळवत असूनही वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत.
आळंदीत डंपर चालकांच्या बेजबाबदारपणे वाहन चालविण्याने दोन निष्पापांचा जीव गेला आहे. तर काही दिवसांपूर्वी मोशीत एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. आळंदीकरांच्या स्मरणातून मागील अपघाताची घटना जात नाही तोच सोमवारी डंपरने दुसरा बळी घेतला. भरधाव अवजड वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी शहरात आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची लेखी मागणी माजी नगरसेवक सागर भोसले यांनी केली आहे.
अपघातांच्या घटना अतिशय वाईट आहेत. मागील सोमवारी एका विद्यार्थी महाराजांचा असाचा चिरडून मृत्यू झाला. तर नुकताच चिमुकलीचा बळी गेला. सातत्याने निवेदने तसेच अनेकांनी मागणी करूनही नगरपालिका अथवा वाहतूक पोलीस प्रशासनाने स्पीडब्रेकर किंवा जडवाहतुकीस बंदी घातली नाही. प्रशासनाचा जाहीर निषेध. - संदीप नाईकरे, आळंदी विकास युवा मंच