पालखी मार्गावरील आठवडे बाजार जीवावर बेतणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:54+5:302020-12-24T04:10:54+5:30
-- नीरा : दिवसेंदिवस वाढत चाललेला नीरेचा (ता. पुरंदर) आठवडे बाजार आता चक्क पुणे - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर ...
--
नीरा : दिवसेंदिवस वाढत चाललेला नीरेचा (ता. पुरंदर) आठवडे बाजार आता चक्क पुणे - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर भरु लागला आहे. प्रभाग दान मधिल बाजारतळावर विक्रेत्यांना जागा मुबलक असते, बाजारकट्टे मोकळे असतानाही शेतकरी जीव मुठीत धरुन महामार्गावर शेतमाल घेऊन बसतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या व अपघात प्रवण असेलेल्या या पालखी मार्गावरील हा आठवडे बाजार जिवावर बेतू शकतो त्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडतील का अशी चर्चा गावात सुरु आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जिवावर बेतू शकरणारा हा आठवडे बाजार तातडीने बंद करा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (ए) गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष आमोल साबळे यांनी केला आहे.
नीरेचा आठवडे बाजार हा आजूबाजूच्या अनेक गावांसाठी महत्वाचा आहे. नीरा पंचक्रोशीतील पाडेगाव, पिंपरे (खुर्द), गुळुंचे, पिसुर्टी, वाल्हा, राख, कर्नलवाडी, जेऊर, मांडकी, निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, चौधरवाडी, वाघाळवाडी या आसपासच्या अनेक गावातून शेतकरी शेतमाल खरेदी- विक्रीसाठी बजारात येत असतात. ताजी व स्वच्छ तरकारी मिळत असल्याने येथे ग्राहकही मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र आता येथील बाजारतळावर या विक्रेत्यांना जागा मुबलक असतानाही, आधी सर्वोदय सोसायटीच्या खाजगी जागेत व आता पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बसत आहेत. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीस मोठा आडथळ निर्माण होत आहेत.
मुळातच हा रस्ता दोन पदरी आहे. रस्त्याचे गटार ओलांडून पांढऱ्या पट्यापर्यंत विक्रेते आपले दुकान थाटून बसतात. या भागात लोणंद व सुरवडीच्या औद्योगिक वसाहतीत वाढलेल्या कारखानदरीमुळे रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जरा जरी दुर्लक्ष झाले तरी मोठा अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. मात्र लाखोंचा कर गोळा करणारी ग्रामपंचायत प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसते आहे. तर वारंवार सूचना देऊन लोक ऐकत नाहीत व ग्रामपंचायत पर्यायी मार्ग काढीत नसल्याने पोलिसांनीही याकडे डोळे झाक केल्याचे दिसून येते आहे.
--
चौकट
बेशीस्त पार्किंग
मागील महिन्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीसांनी नीरा शहरातील सम - विषम तारखेस पार्किंग संदर्भात कडक धोरण अवलंबणार असल्याची घोषणा केली होती. शिस्तीत वाहने पार्किंग न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र पोलीस बेशिस्त पार्किंग बाबत ठोस कारवाई करत नसल्याने वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा बिनदिक्कतपणे वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे भाजीविक्रेते आणि ग्राहक यांच्यामुळे आधीच अरुंद झालेला रस्ता पार्किंगमुळे आणखी अरुंद होतो व त्यामुळे ट्राफिक जाम होते.
--
फोटोओळ : नीरा शहरातून जाणाऱ्या पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर आठवडे बाजारातील बाजारकरु बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
(छाया : भरत निगडे, नीरा)