हिंदी मालिकांमध्ये काम देणार; ऑडिशनच्या नावाखाली तरुणीची ७१ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:26 IST2022-12-29T16:26:05+5:302022-12-29T16:26:27+5:30
तरुणीने फेसबुकवर हिंदी मालिका व चित्रपटात काम करण्यासंबंधीची जाहिरात पाहिली

हिंदी मालिकांमध्ये काम देणार; ऑडिशनच्या नावाखाली तरुणीची ७१ हजारांची फसवणूक
पुणे : हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम करण्याची व ऑडिशन देण्यासाठी विविध कारणे सांगून एका तरुणीला सायबर चोरट्यांनी तब्बल ७१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुण चंद्रशेखर शर्मा (रा. चंदीगड), आशासिंग, क्रिशन चांद (रा. पंजाब) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही एका वसतीगृहात राहते. तिने फेसबुकवर हिंदी मालिका व चित्रपटात काम करण्यासंबंधीची जाहिरात पाहिली. त्यावर ऑडिशनसाठी संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानुसार, तिने संपर्क साधला असता तिला वेगवेगळी कारणे सांगून ७१ हजार ८४९ रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतरही कोणतीही ऑडिशन घेतली नाही. त्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.